|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाण्यासाठी शेतकऱयांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पाण्यासाठी शेतकऱयांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

महाराष्ट्रातून पाणी सोडण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

कृष्णा नदीमध्ये पाणी नसल्यामुळे अथणी, रायबाग, गोकाक, रामदुर्ग, विजापूर जिह्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळे जनता तणावाखाली आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच जिह्यातील मंत्र्यांनी याबाबत गांभीर्य घेतले नाही. त्यामुळे शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महाराष्ट्रातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे. शेतकऱयांचा मोर्चा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जिह्यामध्ये पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. प्यायलाच पाणी नाही तर शेताला पाणी कोठून मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. जनावरांच्या चाऱयाचीही समस्या अत्यंत बिकट होत चालली आहे. जिह्यातील कृष्णा, घटप्रभा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी या सर्व नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. पाणी नसल्यामुळे नदी काठावरील सर्व गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्हा प्रशासनाने दुष्काळाबाबत काहीच गांभीर्य घेतले नाही. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एक चक्कार शब्दही काढला नाही. वास्तविक कोयनामधून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे नेणे गरजेचे होते. पण अद्याप कर्नाटकचे शिष्टमंडळ गेलेच नाही. याचबरोबर पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्राला विनंतीही केली नाही. त्यामुळे जिह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. केवळ बेळगाव जिल्हाच नाही तर विजापूर, बागलकोट, गदग या जिह्यांमध्येही पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

कित्तूर चन्नम्मा चौक येथून शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱयांनी जिल्हा प्रशासन आणि सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. पाणी नाही, चारा नाही आम्ही जगू कसे? असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी कृषक शेतकरी संघटनेचे सिद्धाप्पा मोदगी, रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, राघवेंद्र पुजारी, सुजित मुळगुंद यांच्यासह बैलहोंगल, रामदुर्ग, गोकाक, रायबाग परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न

शेतकऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच बॅरिकेड्स लावून त्यांना अडविण्यात आले होते. यावेळी शेतकऱयांनी बॅरिकेड्स काढून जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तातडीने शेतकऱयांना अडविले. तुम्ही जर अशा प्रकारे आंदोलन करत असाल तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, असा इशारा दिला. यामुळे शेतकऱयांनी थोडी माघार घेतली. पण यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.