|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाण्यासाठी अधिकाऱयांना डांबले खोलीत

पाण्यासाठी अधिकाऱयांना डांबले खोलीत 

वार्ताहर/ खडकलाट

खडकलाटसह अकरा गावासाठी असलेल्या जलनिर्मल योजनेत वारंवार बिघाड होत आहे. तीन वर्षासाठी 3 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर करूनही सर्वच गावात पाणी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिकाऱयांना अनेकवेळा सांगूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांतर्फे जि. पं. अभियंता संजय बनगार व जल निर्मलचे सुपरवायझर हालसोडे यांना खोलीत डांबण्यात आले. तर नवलिहाळ येथे महिलांनी मोर्चा काढून ग्रा. पं. कार्यालयाला टाळे ठोकले. शेवटी तहसीलदार बिरादार यांनी खडकलाट व नवलिहाळला भेट देत पाणी समस्या निवारण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

गेल्या तीन वर्षापासून नवलिहाळ येथे पाण्याची अधिक टंचाई आहे. 10 ते 15 दिवसांनी नळांना पाणी सोडण्यात येते. याबाबत संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना कळविण्यात आले. पण यावर कोणताच निर्णय घेण्यात आले नाही. प्रचंड उन्हाचा तडाखा असल्याने पाण्याअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावातील महिला मोठय़ा संख्येने एकत्र येत नवलिहाळ ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाणी समस्येवर समर्पक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी ग्रा. पं. कार्यालयातील कर्मचाऱयांना बाहेर काढून पंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.

यावेळी मोर्चेकऱयांनी जलनिर्मलचे अभियंते संजय बनगार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. पण बनगार यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे पुन्हा संतापाची लाट वाढली. याचवेळी मोर्चेकऱयांना समजले की बनगार हे खडकलाट ग्रा. पं. मध्ये आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक आपला मोर्चा खडकलाटकडे वळविला. खडकलाट ग्रा. पं. च्या राजू यादव सभागृहात खडकलाट गावातील सतीश पाटील, ग्रा. पं. सदस्य राजू हेग्गाण्णा, ग्रा. पं. सदस्य व नागरिकांनी संजय बनगार यांना घेराव करून पाण्याबाबत प्रश्न विचारला.

याचवेळी नवलिहाळ येथील नागरिकही आले. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. यावेळी उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारले. पण त्याला समर्पक उत्तर मिळाले नाही. उपस्थितांनी जि. पं. जलनिर्मल अभियंता संजय बनगार व सुपरवायझर हालसोडे यांच्याकडे सर्व गावात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्याची मागणी केली. जोपर्यंत टँकर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही, असे सांगत दोघांनाही खोलीत डांबले.

पोलिसांचा फौजफाटा दाखल

अधिकाऱयांना खोलीत डांबून घातल्यानंतर ताबडतोब बनगार यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना दूरध्वनीवरून सर्व माहिती सांगितली. यावेळी तहसीलदार बिरादार यांनी खडकलाट पोलीस स्थानकाला दूरध्वनीवरून सूचना केल्या. त्यामुळे खडकलाट पोलीस स्थानकांतून पोलिसांचा फौजफाटा ग्रा. पं. मध्ये दाखल झाला. यावेळी पोलीस व ग्रामस्थांत बाचाबाची झाली. शेवटी खोलीतून बनगार यांची सुटका करण्यात आली. यावेळी खोलीतून सुटका केल्याने संतप्त नागरिक पाण्यासाठी आमच्यावरही गुन्हा दाखल करा. पण बनगारला सोडणार नाही, असा पावित्रा घेतला.

यानंतर चिकोडीचे उपतहसीलदार एम. एम. पाटील, एम. एम. सवदत्ती, सचिव जी. एम. स्वामी ग्रामपंचायतीत दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी गाऱहाने मांडून पाणी समस्येला अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचे सांगितले. प्रत्येक 3 वर्षासाठी 3 कोटी 20 लाख रुपये निधी असताना अधिकारी व कंत्राटदार यांच्या मनमानी कारभारामुळे 11 गावात पाण्याची समस्या उद्भवत असल्याचे सांगितले. यावेळी अधिकाऱयांनी बनगार यांना पाण्याची व्यवस्था करण्यासंबंधी सूचना केल्या.

 यावेळी नागरिकांनी खडकलाटला 15 वॉर्डात 30, नवलिहाळ येथील 4 वॉर्डसाठी 8, पट्टणकुडीत 8 वॉर्डात 16 टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी तहसीलदार संतोष बिरादार व खडकलाट पोलीस  स्थानकाचे उपनिरीक्षक बागेवाडी घटनास्थळी दाखल झाले. पणी समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी उपस्थित नवलिहाळ, खडकलाट, पट्टणकुडीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी तहसीलदारांनी नादुरुस्त असलेले पंपसेट मंगळवार सायंकाळपर्यंत आणून बसविणे, त्याचबरोबर गावातील लहान-मोठय़ा टँकरने पाण्याची व्यवस्था करणे, टँकरने पाणीपुरवठा करणाऱयांना योग्य भाडे देणे तसेच पाणी योजनेकडे लक्ष देण्याची सूचना ठेकेदारांना केली. तर बनगार यांनी दुर्लक्ष केल्याने तीन दिवसात त्यांचे कंत्राट काढून दुसऱयांना देण्याची व्यवस्था करावी. शिवाय गेल्या आठ महिन्यापासून कोल्हापूर येथे दुरुस्तीला टाकण्यात आलेले पंपसेट ताबडतोब आणून घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन न करता सहकार्य करावे व समस्येबाबत वरिष्ठांना कळवावे, असे सांगितले.

यावेळी विद्याधर कागे, काका खड्ड, सुभाष कुंभोजे, इराप्पा वड्डर, राजू मसाळे, लक्ष्मण वाघे, शंकर आवडखान, प्रविण पाटील, बी. महेश, तात्यासो कमते, शामू हुवाण्णावर, पुरंदर परिट, इलियास लाटकर, संतोष टाकळे, हबीब परकुटे यांच्यासह खडकलाट, नवलिहाळ, पट्टणकुडी येथील नागरिक उपस्थित होते.