|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोयनेच्या पाण्यासाठी जनता आक्रमक

कोयनेच्या पाण्यासाठी जनता आक्रमक 

वार्ताहर/ अथणी, मांजरी

कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अथणी, चिकोडी, रायबाग, जमखंडी तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळय़ामध्ये पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. प्रत्येकवर्षी यावर तोडगा काढत महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून कृष्णा नदीला पाणी सोडून पाणी टंचाईवर मात करण्यात येते. मात्र यंदा कोयनेतून पाणी सोडण्यात न आल्याने तीन महिन्यांपासून नदी कोरडी पडली आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे हाल होत आहे. शेतीपिके करपली आहेत. यातून जनतेमध्ये हाहाकार माजला असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान  कोयनेतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी अथणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर मांजरी येथे रास्ता रोको करून तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

 प्रत्येकवर्षी अथणी तालुक्यातील जनता दुष्काळाने होरपळते. असे असतानाही येथील पाणी समस्येवर पूर्ण तोडगा निघालेला नाही. यंदाही पाणीटंचाई तीव्र प्रमाणात असताना कृष्णा नदीला अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कृष्णाकाठ क्षेत्रात येणाऱया मतदारसंघातील आमदारांनी राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन आंदोलकांनी केले. सोमवारी पाण्यासाठी पाणी आंदोलन समिती, पत्रकार संघ तसेच विविध संघटनांच्यावतीने अथणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मरुनसिद्ध स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरुन तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार एम. एन. बळीगार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना पाणी आंदोलन समितीचे अध्यक्ष बसगौडा पाटील यांनी पाणी समस्येवर दोन्ही राज्यांनी सामंजस्यपणाने तोडगा काढून पाणी करार करावा, अशी मागणी केली. पाणी समस्या न मिटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ऍड. के. ए. वनजोळी, विजय आढहळी, अनिल सौदागर, अरविंद देशपांडे, आनंद टोणवे, डॉ. व्ही. पी. मिरजकर, शब्बीर सातबच्चे, रवि कांबळे, संतोष सावडकर, पुट्टस्वामी, सिद्धार्थ शिंगे, महादेव मडवाळ, गोविंद पाटील, कुमार मडवाळ, राजू जंबगी, आण्णाप्पा हवूर यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, आंदोलक उपस्थित होते.

आंदोलनामुळे शहरात शुकशुकाट

पाणी समस्या सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या आंदोलनामुळे सोमवारी अथणी शहरातील प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी व्यवहार ठप्प होते. महामंडळाच्या बहुतांशी बसेस आगारात थांबून असल्याने आगाराचे लाखेंचे नुकसान झाले. तसेच सांगली, मिरजला जाणाऱया प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हक्काचे चार टीएमसी पाणी सोडा

 कृष्णा नदीत पाणी नसल्याने नदीकाठची जनता अक्षरशः होरपळून निघत आहे. राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून हक्काचे चार टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडून येथील जनतेची पाणी समस्या दूर करावी, अशी मागणी चिकोडीचे संपादना महास्वामी यांनी मांजरी येथे विविध संघटना व शेतकऱयांतर्फे छेडलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी केली.

मांजरी येथे विविध संघटना व मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी येथील शेतकरी यांच्यावतीने कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मांजरी बसस्थानक परिसरातील व्यवहार बंद करून राज्य मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. यावेळी चिंचणीचे अल्लमप्रभू स्वामी, चिकोडीचे संपादना स्वामी, माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेण्णावर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी यांच्या उपस्थितीत बसस्थानकापासून कृष्णा नदीवरील पुलापर्यंत विविध घोषणा देत फेरी काढण्यात आली व नवीन पुलानजीक रास्ता रोको करण्यात आला.

राज्य सरकारने प्रयत्न करावेत

अल्लमप्रभू स्वामी म्हणाले, गेली तीन महिने कृष्णा नदीला पाणी नसल्याने शिवाय वळीव पावसाने पाठ फिरविल्याने नदीकाठावरील तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून पाण्याअभावी पशूपक्ष्यांचे जीवनही धोक्यात आले आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कोयनेतून चार टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कल्लाप्पाण्णा मग्गेण्णावर यांनी, तीन महिन्यापासून नदीकाठावरील पिके करपू लागली आहेत. तसेच पाणी समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे, असे सांगितले. यावेळी तहसीलदार संतोष बिरादार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.