|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » क्राउड फंडिंग की पाठशाला

क्राउड फंडिंग की पाठशाला 

आज गावोगावी शिक्षण, आरोग्य, स्त्रियांना मदत करणाऱया नानाविध संस्था आहेत. निरलसपणे काम करणाऱया कार्यकर्त्यांच्या बळावर मोठी कामे उभी राहताना दिसतात. तरीदेखील अनेक समाजोपयोगी कार्यांना म्हणावा तितका निधी उपलब्ध होत नाही. राज्यात वा देशात धनवंतांची कमी नाही. भारतात तर अब्जाधीशांची संख्या जबरदस्त गतीने वाढते आहे. परदेशात बिल गेट्स, वॉरन बफे आणि भारतात टाटा, नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, अझीम प्रेमजी अशा अब्जाधीशांनी सामाजिक कार्यांसाठी संस्था उभारल्या आहेत वा भरघोस देणग्या दिल्या आहेत.  आज घरोघरी जाऊन एखाद्या सत्कार्यासाठी निधी संकलन करण्याची मोहीम राबवण्याची तशी गरज नाही. इंटरनेटच्या माध्यमातून निधी जमवता येतो आणि यालाच ‘क्राउड फंडिंग’ असेही नाव आहे. अगदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार असो, चित्रपटनिर्मिती असो किंवा एखादी प्राणीमित्र संघटना असो, तिला या माध्यमातून भांडवल उभे करता येते. अनेक वेबसाइट्स किंवा स्वयंसेवी संस्थांनी निधी उभारणी केल्याचे ऐकिवात आहे. या पार्श्वभूमीवर, तीन हजार वर्षं प्राचीन अशा संस्कृत भाषेत शिक्षण देणाऱया संस्थेने क्राउड फंडिंगचा मार्ग यशस्वीपण राबवला आहे. कर्नाटकातील मेलुकोटे येथील श्री आचार्य पाठशालेसाठी जगातील एक हजार दात्यांनी मिळून 26 लाख रु. दिले आहेत. 17 मार्च 2009 रोजी याप्रकारचे आवाहन केले गेले आणि इतक्मया अल्पावधीत एवढी रक्कम गोळा झाली. या पाठशालेचे दुसरे नाव ‘आनंद आश्रम’ असेही आहे. मोलुकोटे इथली ही अखेरची संस्कृत शाळा. हे ठिकाण दक्षिणेतील नालंदा म्हणूनही ओळखले जाते. दशकभरापूर्वीच सुरू झालेली शाळा सध्या वाईट अवस्थेत आहे. छपरांना फटी पडल्या आहेत व त्यातून पाणी गळते. मुलांना अनेकदा भोजनही मिळत नाही. पावसाळय़ात छपरातून 100 टक्के पाणी गळते आणि उन्हाळय़ात छपरावरील ऍस्बेस्टॉसचे पत्रे इतके तापतात की मुलांच्या अंगावर पुरळ येतात. पुरेसा निधी जमा झाला की शाळेला माध्यान्ह भोजनासाठी तरतूद करता येईल. अन्नधान्यासाठी आगाऊ पैसे देता येतील, असे व्यवस्थापनाला वाटते. शाळेत उरलेल्या पाच शिक्षकांना गेले 19 महिने पगार मिळालेला नाही.

भारतात मेलुकोटेसारखी काहीच गावे अशी आहेत की जेथे संस्कृतमधून व्यवहार चालतात. ती इथली संपर्कभाषा आहे. अठराव्या शतकात म्हैसूरचा राजा टिपू सुलतानच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या अनेक प्राचीन परंपरा जतन करण्याचा या गावाचा प्रयत्न आहे. मेलुकोटेतील जनता संस्कृत तर जाणतेच, पण वेद, उपनिषदे आणि अन्य प्राचीन ग्रंथांचाही त्यांचा व्यासंग असतो. बंगलोरपासून दीडशे कि.मी. अंतरावर एका टेकडीवर वसलेल्या गावातील या शाळेत गणितापासून भूगोलापर्यंतचे सर्व विषय संस्कृतमधून शिकवले जात. परंतु ज्या वीस शाळांमधून हे काम चालत होते, त्या सर्व गेली दहा वर्षं बंद आहेत. श्री आचार्य पाठशाळेची स्थापना परमहंस इत्यादि सतगोप रामानुज जीयार यांनी केली. ते श्रीविलिपुत्तुर येथील नामांकित संत. मुलांच्या शिक्षणासाठी ही जागा अनुकूल ठरेल, असे वाटून 2010 साली त्यांनी या शाळेची स्थापना केली. विज्ञान, भूगोल, समाजशास्त्र आदि सर्व विषय प्राचीन ग्रंथांच्या आधारे संस्कृतमधून शिकवले जातात. बेंगलुरू विद्यापीठाची त्यास मान्यता असून, कर्नाटक संस्कृत विद्यापीठाची संलग्नता मिळावी, यासाठी संस्थेने अर्जही केला आहे. भगवद्गीता, वेद, उपनिषदे, भागवत, श्रीभाष्य आणि अन्य अनेक प्राचीन ग्रंथांचे अध्यापन केले जाते. वास्तविक मेलुकोटे हे बेंगलुरूसारख्या आयटी सिटीपासून जवळ आहे. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि दुसऱया बाजूला प्राचीन ग्रंथांचे अध्ययन, अशी कर्नाटकातली अनोखी संस्कृती आहे. अर्थात प्राचीन परंपरांचे उदात्तीकरण, आमच्या संस्कृतीत पूर्वीपासून सर्व ज्ञान ठासून भरले होते, अशा प्रकारच्या वल्गना करणे वेगळे. पण त्याचवेळी, आपल्याकडील उत्तम परंपरा व ज्ञानाचे अध्ययन करणे व या परंपरांचे जतन-संवर्धन करणे ही कामे महत्त्वाचीच आहेत. क्राउड फंडिंगसाठी ‘वूद’ हा प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे आवाहन करण्यात आले आणि अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर व मध्यपूर्वेतील 998 देणगीदारांकडून रक्कम गोळा करण्यात आली. त्यामुळे पाठशाला बंद होता होता वाचली. शाळेवर देखरेख करणाऱया जीयार मठाचे एक शिष्य विजयराघवन हे डेटा सायंटिस्ट आहेत. त्यांनी निधी संकलनाच्या मोहिमेत सहभाग घेतला. सुरुवातीला आम्ही काही मित्रांनी मिळून निधी जमा करण्याचे ठरवले होते. परंतु श्री आचार्य पाठशालेच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक तितके भांडवल आम्ही जमा करू शकलो नसतो. म्हणून हा क्राउड फंडिंगचा मार्ग स्वीकारला, असे ते सांगतात.

या उदाहरणापासून आपण खूप शिकण्यासारखे आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जुन्या नामवंत मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने सरकारी शाळांची गुणवत्ता उंचावून त्या खासगी शाळांच्या तोडीस तोड बनवल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तरणतलावासारख्या सुविधा नाहीत. संग्रहालये आणि कलादालने निधीच्या प्रतीक्षेत आहेत. साहित्य, इतिहास, विज्ञान या क्षेत्रात संशोधन करणाऱया संस्थांनाही कार्यक्षेत्र विस्तारासाठी पैसा हवा आहे. आपल्याकडे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सरकारतर्फे अनुदान दिले जाते. हे अनुदान घेतले जाण्यास अनेकांचा तात्विक विरोध असतो. संमेलनासाठी अ. भा. मराठी महामंडळातर्फे महाकोशाची संकल्पना राबवण्यात आली, पण त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यावर क्राउड फंडिंगच्या माध्यमातून भांडवल उभे करणे हा पर्याय ठरू शकतो.  संस्कृत भाषेबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. ती शिकणे म्हणजे काहीतरी प्रतिगामी मूल्यांचा स्वीकार करणे असे मानले जाते. केवळ अडाणी व मूर्ख माणसांनाच संस्कृत भाषेची थोरवी समजणार नाही. संस्कृत ही प्राचीन आणि अभिजात भाषा खरी. पण मनात आणलें तर संस्कृत ही परस्परसंवादाची, संभाषणाची भाषाही बनू शकते. भारतात काही गावांमध्ये ती तशी आहेही. अलीकडेच ऍक्सिस बँकेने आपल्या एटीएमचा वापर करण्यासाठी संस्कृत भाषेचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. संस्कृतात आजही काव्य व इतर लेखन होत असते. विविध विषय आणि ज्ञानशाखांमधून संस्कृत भाषेचा वापर पूर्वीपासून होत आला आहे. विदेशांतूनही संस्कृतचे अध्यन-अध्यापन आजही होत असते. अनेक परदेशी संस्कृतप्रेमी भारतात येऊनही संस्कृत भाषा शिकताना दिसतात. संस्कृतची पार्श्वभूमी असली, तर भारतीयच नव्हे, तर जगातील कोणतीही अन्य भाषा शिकणे हे नक्कीच सोपे जाते. केवळ आर्थिक कारणामुळे तिचे अध्ययन-अध्यापन थांबणे ही खरोखरीच दुर्दैवाची गोष्ट आहे. संस्कृत ही एक नितांत सुंदर भाषा असून, प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाचा अमोल खजिना जाणून घ्यायचा असेल, आणि आजच्या भाषिक स्थितीचा धांडोळा घ्यायचा असेल, तर ही भाषा शिकायलाच हवी. म्हणूनच मेलुकोटेचा कित्ता गिरवण्यासारखा आहे.

नंदिनी आत्मसिद्ध 

Related posts: