|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लोकसभा निकाल कोणाच्या बाजूने?

लोकसभा निकाल कोणाच्या बाजूने? 

विविध तर्क व्यक्त होत असले तरी 23 मे रोजी दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीय कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत तर मतदार  निकाल समजावेत म्हणून विलक्षण उत्सुक झाले आहेत. यामुळे आगामी पाच वर्षांसाठी कोकणातून खासदार म्हणून कुणी काम करावे याचा निर्णय होणार आहे.

अनेक दिवस ज्याची प्रतीक्षा होती तो 23 मे उद्यावर येऊन ठेपला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या हितचिंतकांना, पक्षपेमींना एवढेच काय तर सामान्य मतदारांनादेखील उत्सुकता असणारा मतमोजणीचा दिवस अखेर येऊन ठेपला आहे. राजकीय कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत तर मतदार हे निकाल समजावेत म्हणून विलक्षण उत्सुक झाले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढाई राणे विरुद्ध शिवसेना अशीच रंगत आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना मालवण मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकी दिली. परंतु अशी काही कारणे उत्पन्न झाली की, राणेंना काँग्रेस पक्षात राहणे शक्य झाले नाही. पक्ष सोडताना त्यांना विधान परिषदेची आमदारकी सोडावी लागली. पुढे ते भाजपाच्या जवळ गेले. या पक्षाने त्यांना राज्यात मंत्रीपद नाही तरी राज्यसभेचे खासदार केले.

या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबीयांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची खासदारकी मिळवावी असे वाटू लागले. कोकणातील राजकीय अस्तित्वासाठी त्याची नितांत गरज त्यांना वाटू लागली. राज्यसभेची जागा भाजप श्रेष्ठींच्या सुचनेवरून मिळालेली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंडय़ाखाली निवडणूक लढली तर आपल्या हिमतीवर खासदारकी मिळवली गेली अशी नोंद राजकीय क्षेत्रात होणार असल्याने राणे कुटुंबीयांना त्याची अधिक गरज वाटत आहे.

विधानसभेची गणिते कशी असतील ते निश्चित व्हायला बराच वेळ आहे पण लोकसभा †िनवडणूक लढण्याची संधी सोडू नये म्हणून नारायण राणे यांनी आपल्या पुत्राला या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी निवडणूक लढण्याविषयीचे सर्व कसब पणास लावले आहे. शिवसेना जी तंत्रे वापरते त्या साऱया तंत्रांवर मात करण्याची विद्या राणे कुटुंबीयांकडे असल्याने ही लढत चुरशीची बनेल असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.

काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी उमेदवार म्हणून किमान संपर्क व प्रचार मोहीम राबवल्याचे दिसले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात ताकदीने उभा राहणारा उमेदवार म्हणून निलेश राणेंशिवाय दुसरा कोणीही पुढे आला नाही. बांदिवडेकर यांनी निवडणूक लढवावी म्हणून काँग्रेसच्या आमदार हुस्नबानू खलिफे यांनी गळ घातली. खरेतर खलिफे यांनीच ही निवडणूक लढवावी म्हणून पक्षाकडून आग्रह होत होता. लोकसभा निवडणूक लढणे हे किती अडचणी आणि निराशाजनक परिणामांचे आहे याची जाण खलिफे यांना असल्याने त्यांनी बांदिवडेकर यांना गळ घालून पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची रचना केली. त्यात पक्षाला यश मिळण्याची सूतराम अपेक्षा नव्हती. फक्त मतपत्रिकेवर नाव राहण्यासाठी योग्य उमेदवाराचा अर्ज सादर व्हावा इतकीच तांत्रिकता यातून घडली.

शिवसेना हा पक्ष रत्नागिरी-सिंधुदुर्गात मातब्बर पक्ष मानला जातो. पण लोकसभा निवडणूक लढताना या पक्षाच्या नेत्यांची दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावेळी दीड लाखाचे मताधिक्य होते ते यावेळी वाढेल असे सेना नेते म्हणत असले तरी राजकीय निरीक्षकांना मात्र तसे वाटत नाही. शिवसेनेवर दमछाक आणण्याची पाळी ही राणेंच्या कुशल मोहिमेमुळे आली असेही सांगितले जात आहे. विनायक राऊत यांनी ही निवडणूक पुन्हा एकदा लढवली असली तरी त्यांना दिवसा आपल्यासोबत काम करणारे अनेकजण रात्री शिवसेनेच्या वर्तुळात असतात का यावर लक्ष ठेवावे लागले.

सावंतवाडी, कुडाळ-मालवण, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी मताधिक्य मिळेल असे गणित शिवसेना नेते मांडत आहेत. तथापि, सेनेच्या कारभाराला पर्याय मिळावा म्हणून वाट पाहणारे मतदार याच निवडणुकीत आपले मत नोंदवणार आहेत. यदा कदाचित राणेंना विजय मिळाला तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणण्याची संधी ते सोडणार नाहीत असाही अंदाज व्यक्त होत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात गतवेळीप्रमाणे शिवसेनेचे अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात थेट सामना आहे. सलग 7 व्या विजयासाठी अनंत गीतेंनी मोठी ताकद लावली असली तरी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे सगळ्या क्षमता पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. गेल्या वेळी निसटत्या फरकाने त्यांचा  पराभव झाला होता, पण यावेळी तसे होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व काळजी त्यांनी घेतली आहे. तटकरेंच्या विविध क्षमतांपुढे अनंत गीते यांचा निभाव लागेल का असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे.

विविध तर्क व्यक्त होत असले तरी 23 मे रोजी दुपारपर्यंत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे आगामी पाच वर्षांसाठी कोकणातून खासदार म्हणून कुणी काम करावे याचा निर्णय होणार आहे.

सुकांत चक्रदेव