|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मलेशियाकडून भारताचा पराभव

मलेशियाकडून भारताचा पराभव 

वृत्तसंस्था \ नेनिंग
चीनमध्ये मंगळवारपासून सुरू झालेल्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सलामीच्या लढतीत मलेशियाकडून हार पत्करावी लागली. ड गटातील या सामन्यात मलेशियाने भारतावर 3-2 अशी मात केली. या पराभवामुळे भारताची आता बाद फेरीत प्रवेश मिळविण्याची आशा अंधूक झाली आहे.
या सलामीच्या लढतीत मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या एस. रेनकीरेड्डी आणि अश्विनी पोन्नाप्पा या जोडीने मलेशियाच्या हआत आणि जेमी यांचा 70 मिनिटांच्या कालावधीत 16-21, 21-17, 24-22 असा पराभव करून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली पण त्यानंतर पुरूष एकेरीच्या सामन्यात मलेशियाच्या ली जियाने भारताच्या समीरचा 21-13, 21-15 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या पुरूष एकेरीच्या लढतीसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने के. श्रीकांतच्या जागी समीरला खेळविण्याचा निर्णय अंमलात आला. दरम्यान महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधुने मलेशियाच्या वेईचा 21-12, 21-8 असा पराभव करत पुन्हा आपल्या संघाला आघाडीवर नेले. सिंधुने हा सामना 35 मिनिटात जिंकला. त्यानंतर दुहेरीच्या लढतीत मलेशियाच्या ऍरोन चिया आणि तेओ ई या जोडीने भारताच्या मनु अत्री आणि सुमीत रेड्डी यांच्यावर 22-20, 21-19 अशी मात करत मलेशियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या निर्णायक सामन्यात मलेशियाच्या चो कुआन आणि येन या जोडीने भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचे आव्हान 21-11, 21-19 असे संपुष्टात आणत आपल्या संघाला ही लढत जिंकून दिली. आता या स्पर्धेत बुधवारी भारताचा सामना बलाढय़ चीनशी होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात 2011 आणि 2017 साली भारताने उपांत्यपूर्व गाठली होती.