|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपमधील आव्हाने पहिल्या चेंडूपासूनच सुरु होतील

वर्ल्डकपमधील आव्हाने पहिल्या चेंडूपासूनच सुरु होतील 

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे स्पष्ट प्रतिपादन, भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला 5 जून रोजी प्रारंभ, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार सलामीची लढत

 मुंबई / वृत्तसंस्था

आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असल्याने ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल, तेथे पहिल्या चेंडूपासूनच संघाच्या आव्हानांना सुरुवात होईल, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले. इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषक स्पर्धेला दि. 30 मे पासून प्रारंभ होत असून भारतीय संघ त्यासाठी रवाना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत विराट बोलत होता. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील यावेळी उपस्थित होते.

1992 विश्वचषकानंतर प्रथमच एखाद्या आवृत्तीत सर्व संघ एकमेकांशी प्रत्येकी एक सामना खेळतील आणि त्यातून पहिले चार अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. यंदा या आवृत्तीत दि. 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीची लढत झाल्यानंतर भारताचे पुढील सामने ऑस्ट्रेलिया (दि. 9 जून), न्यूझीलंड (13 जून) व पाकिस्तान (16 जून) यांच्याविरुद्ध होतील. त्यानंतर अन्य लढतींसह लंकेविरुद्ध भारताची शेवटची साखळी लढत होणार आहे.

विराट कोहली यंदा आपला तिसरा विश्वचषक खेळणार असून या आवृत्तीत पहिल्या चारही कठीण सामन्यात संघाचा कस लागेल, असे त्याने म्हटले आहे. ‘माझ्या मते मी खेळत असलेला हा सर्वात कठीण वर्ल्डकप फॉरमॅट आहे. सर्वच संघ आता मजबूत आहेत. 2015 मधील अफगाणचा संघ व त्यांचा आताचा संघ यातील फरक येथे दिसून येतो. कोणताही संघ कितीही बलाढय़ संघाला नमवू शकतो. त्यामुळे, सर्वोत्तम खेळ साकारणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल’, असे विराट येथे म्हणतो.

अल्पसंतुष्टतेला जागा नसेल

‘विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघ सर्वोत्तम कामगिरी साकारण्यासाठी इच्छुक असेल. यामुळे, अल्पसंतुष्टतेला अजिबात जागा नसेल. याचमुळे हा विश्वचषक आहे. येथे पहिल्या टप्प्यापासूनच दडपण झेलावे लागेल आणि पुढे संधी मिळेल, हा आमचा अजिबात दृष्टिकोन नसेल. पहिल्या सामन्यापासूनच वर्चस्व गाजवण्यावर आम्ही भर देणार आहोत. पहिल्या चारही लढती कठीण आहेत. त्यामुळे, पहिलाच आठवडा दडपणाचा असेल. मात्र, ज्याप्रमाणे प्रीमियर लीग किंवा ला लिगा स्पर्धेत तीन-चार महिने त्या स्पर्धेतील क्लब संघ आपला अव्वल दर्जा, सातत्य राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, तसे करताना आमचा कस लागेल’, असे या भारतीय कर्णधाराने पुढे नमूद केले.

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातील काही लढतीत 300 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी झाली. मात्र, विश्वचषक स्पर्धेदरम्यान काही संदर्भ बदललेले असू शकतात, असे विराटचे मत आहे. ‘इंग्लंडमधील खेळपट्टय़ा नेहमीच उत्तम असतात. तेथे क्रिकेटसाठी सध्या अतिशय आल्हाददायक वातावरण असेल. काही सामन्यात धावांची आतषबाजी होऊ शकते. पण, याचा अर्थ प्रत्येक सामन्यात तसे होईलच असे नाही. बऱयाच लढतीत 260-270 धावांचे आव्हान असू शकते आणि या धावसंख्येचे रक्षण करणाऱया संघाचा कस लागू शकतो. उपांत्य फेरीसाठी शक्य तितक्या लवकर पात्रता निश्चित करणे, हा आमचा प्राधान्यक्रम असेल आणि इंग्लिश वातावरणात दडपण झेलत नैसर्गिक खेळ साकारणे आव्हानात्मक असेल’, याचा त्याने येथे उल्लेख केला.

भारताचे गोलंदाज सज्ज

भारतीय गोलंदाज 50 षटकांच्या क्रिकेटसाठी पूर्ण सज्ज आहेत, याचाही विराटने एका प्रश्नाला उत्तर देताना उल्लेख केला. ‘आयपीएल खेळत असतानाच आमचे गोलंदाज 50 षटकांच्या क्रिकेटसाठी स्वतंत्र तयारी करत होते. त्यामुळे, चार षटके टाकल्यानंतर त्यातील कोणीही थकल्यासारखे जाणवत नव्हते. चार षटके पूर्ण केल्यानंतरही ते ताजेतवाने होते. 50 षटकांच्या क्रिकेटसाठी आपल्याला तंदुरुस्त रहायचे आहे, हेच लक्ष्य त्यांच्या नजरेसमोर होते. आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कामगिरी अपेक्षित झाली नसली तरी तो अनुभव बरेच धडे देणारा होता’, असे विराट शेवटी म्हणाला.

शास्त्री म्हणतात, धोनीचे योगदान सर्वात महत्त्वाचे ठरेल!

भारताने पुन्हा विश्वचषक जिंकण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरेल, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नमूद केले. ‘धोनीचा संवाद अतिशय उत्तम असतो. यष्टीरक्षक या नात्याने मागील अनेक वर्षात त्याने आपली प्रगल्भता दाखवून दिली आहे. उत्तम झेल घेण्याबरोबरच चपळतेने फलंदाजाला धावबाद करणे, यष्टीचीत करणे, यात त्याचा हात कोणीच धरु शकत नाही’, असे शास्त्री याप्रसंगी म्हणाले.

अनुभवी धोनी यंदा येथे आपला चौथा विश्वचषक खेळत असून अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने 83.2 च्या सरासरीने 416 धावांची आतषबाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. धोनीचे आयपीएलमधील फूटवर्क अतिशय लक्षवेधी होते, याचा शास्त्री यांनी येथे उल्लेख केला.

‘आयपीएलमध्ये धोनीने जोमाने फलंदाजी केली, ते अतिशय सुखावणारे होते. त्याच्यासारखा फलंदाज बहरात असणे, केव्हाही अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे, आगामी विश्वचषक स्पर्धेत त्याची हजेरी संघासाठी बलस्थान असणार आहे. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा पाटा स्वरुपाच्या असतील. पण, ढगाळ वातावरण असेल तर सारे चित्रच बदलून जाऊ शकते. सध्याची आमची गोलंदाजी लाईनअप अतिशय उत्तम आहे. मागील 4-5 वर्षांपासून ते एकत्रित आहेत आणि यामुळे त्यांच्यात एकवाक्यता आहे, एकसंधपणा आहे’, असे ते म्हणाले.