|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » सायबर हल्ल्यामध्ये बेंगळूर शहर आघाडीवर

सायबर हल्ल्यामध्ये बेंगळूर शहर आघाडीवर 

क्विकहीलच्या अहवालातून स्पष्ट   मुंबई, दिल्ली-एनसीआरसह कोलकाता सारख्या शहरांवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष

वृत्तसंस्था \ मुंबई

गेल्या वर्षभरात (2018) देशातील प्रमुख आयटी हब असणाऱया बेंगळूरमध्ये  सर्वाधिक सायबर हल्ले झाल्याचे कॉम्प्युटर सिक्मयुरिटी क्षेत्रातील अग्रगण्य क्विकहील’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कॉर्पोरेट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची मुख्यालये बेंगळूर शहरात असल्याने मोठय़ा प्रमाणात गुन्हे घडविण्यासाठी सायबर गुन्हेगार याठिकाणी कार्यरत असल्याचे क्विकहील सहसंस्थापक संजय काटकर यांनी सांगितले.

मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता आदी मोठय़ा शहरांवरही सायबर गुन्हेगारांनी लक्ष केंद्रित केले असून, 2018 मध्ये या शहरांतील विंडोज प्लॅटफॉर्मवर 97.3 कोटी मालवेअर हल्ले झाल्याचेही दिसून आले असून या तीन शहरांमध्ये प्रतिदिन 20.67 लाख हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर क्विकहीलने मुंबई, दिल्ली, बेंगळूर, कोलकाता आणि पुणे ही शहरे सायबर हल्ल्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनील असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. या शिवाय गेल्या वषी विंडोज कॉम्प्युटरवर दर मिनिटाला 1985 हल्ले झाल्याचेही अहवालातून स्पष्ट केले आहे.

विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइडसह अन्य ऑपरेटिंग सिस्टीमच्या तुलनेत सायबरहल्ल्यांना सहज बळी पडते, असेही काटकर यांनी नमूद केले. सायबर गुन्हेगारांकडून प्रामुख्याने ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, खासगी माहिती आणि संग्राह्य आठवणी आदींना लक्ष्य केले जाते. या शिवाय सिस्टीममध्ये ट्रोजनचा भडीमार करून डेटाचोरी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. बऱयाचदा सर्वसामान्य ग्राहक सिस्टीम अपडेट करण्यावर भर देत नाही. त्यामुळे हल्ले करून माहिती सहज चोरली जाते.

सध्या कोणत्याही ऑनलाइन कामासाठी स्मार्टफोनचा वापर नको इतका वाढल्याने रॅन्समवेअर, वेबकॅम, वेब सिक्मयुरिटीचे प्रश्नही वाढले आहेत, असेही काटकर यांनी नमूद केले.

वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे वाढले आव्हान…

गेल्या वर्षभरात सर्वाधिक सायबर हल्ले विंडोजवर झाल्याचेही क्विकहीलने अहवालात नोंदवले आहे. या शिवाय रॅन्समवेअर, क्रिप्टो-मायनर्स आणि बँकिंग ट्रोजनसारखे धोकेही वाढत चालले आहेत. तसेच सिग्नेचर आधारित सुरक्षा प्रणाली भेदून सॉफ्टवेअरवर हल्ला करण्याची क्षमताही हल्लेखोरांकडे आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याचे आव्हान वाढले आहे.

या प्रकारांकडेही दुर्लक्ष केल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे संजय काटकर यांनी स्पष्ट केले.