|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » गुगलकडून ‘हुवावे’ला मोठा धक्का

गुगलकडून ‘हुवावे’ला मोठा धक्का 

स्मार्टफोनमधून महत्वाची ऍप होणार गायब

वृत्तसंस्था \ नवी दिल्ली

फोनचे उत्पादन करणाऱया हुवावे या कंपनीला गुगलने ऍन्ड्रोईड ऑपरेटिंग सिस्टिममधील काही गोष्टी वापरण्यास प्रतिबंध केला आहे. हुवावेच्या नवीन स्मार्ट फोनमधून गुगलचे महत्त्वाचे ऍपही गायब होणार आहेत. ज्या कंपन्यांकडे परवाना नाही, त्यांच्यासोबत अमेरिकन कंपन्या व्यापार करू शकणार नाहीत, असा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहे. अशा कंपन्यांची एक यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. हुवावेचाही या यादीमध्ये समावेश झाल्यानंतर गुगलने त्यांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

 प्रशासनाच्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे आणि त्याचे काय परिणाम होतील याचा आम्ही अभ्यास करत आहोत, असे यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून गुगलने सांगितले आहे.

हुवावेला विरोध

गेल्या आठवडय़ात ट्रम्प प्रशासनाने हुवावेचा समावेश ‘एन्ट्री लिस्ट’मध्ये केला होता. ‘एन्ट्री लिस्ट’ म्हणजे अशा कंपन्यांची यादी ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांकडून हुवावेला मोठय़ा प्रमाणावर विरोध होत आहे. हुवावेच्या 5 जी मोबाईल नेटवर्कच्या वापरावरून हा विरोध केला जात आहे.

 आगामी काळात पाश्चिमात्य देशांमध्ये हुआवेला मोठा धक्का बसू शकतो.

गुगल प्ले स्टोअर, यूटय़ुब, गुगल मॅप्स यासारखे फीचर नसलेले ऍन्ड्रॉईड फोन विकण्यासाठी कोणतेही दुकानदार तयार नाहीत. पण जर दूरगामी परिणामांचा विचार केला तर भविष्यात स्मार्टफोन उत्पादक गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टिमला पर्याय शोधू शकतात. या सगळय़ाचा परिणाम हुवावेच्या सॅमसंग ही कंपनी ताब्यात घेणे आणि 2020 पर्यंत सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन ब्रँड म्हणून विकसित होणाच्या महत्त्वाकांक्षेला फटका बसणार आहे.