|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आता पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष हवे

आता पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष हवे 

ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत गोव्यातील पर्यटनस्थळे, समुद्र किनारे आणि प्रमुख शहरे पर्यटकांनी गजबजलेली असतात. आता तर गोवा हे 365 दिवसांचे पर्यटनस्थळ बनलेले आहे.

 

पर्यटन क्षेत्र असलेले गोवा राज्य सध्या देशी आणि विदेशी पर्यटकांनी गजबजून गेले आहे. समुद्रकिनाऱयावर देशी पर्यटकांची झुंबड उडालेली दिसून येते तर विदेशी पर्यटक समुद्रकिनाऱयावर ‘सनबाथ’ घेताना दिसून येतात. गोवा हे आज जागतिक स्तरावरचे एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम आज पर्यटन क्षेत्र करीत आहे.

गोव्यात खाणबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना पर्यटनाच्या रुपात एक नवा आशेचा किरण गोव्याला मिळालेला आहे मात्र याचा व्यवस्थितपणे फ्ढायदा घेत कशाप्रकारे पर्यटनाचे अर्थव्यवस्थेत रुपांतर करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गोव्याला समुद्रकिनाऱयाचे मोठे वरदान लाभले आहे. त्याचबरोबर निसर्गसौंदर्याचेपण मोठे देणे गोव्याला लाभलेले आहे. गोवा हा शांत आणि सुंदर प्रदेश म्हणून ओळखला जातो. गोव्याचे निसर्गसौंदर्य, गोव्याचे आदरातिथ्य, गोव्यातील माणसांचे प्रेम आणि एकूणच वातावरण यामुळे देशभरातील आणि विदेशातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. दरवर्षी देशी आणि विदेशी पर्यटक मिळून सुमारे 60 लाख पर्यटक गोव्याला भेट देतात.

ऑक्टोबर ते मे अखेरपर्यंत गोव्यातील पर्यटनस्थळे, समुद्र किनारे आणि प्रमुख शहरे पर्यटकांनी गजबजलेली असतात. आता तर गोवा हे 365 दिवसांचे पर्यटनस्थळ बनलेले आहे. त्याचबरोबर ‘वेडिंग डेस्टिनेशन’ म्हणूनही गोवा पुढे येत आहे. देश-विदेशातील बडे व्यावसायिक आणि अतिमहनीय व्यक्ती गोव्याला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून पसंती देतात. गोव्यात अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वे, चित्रपट स्टार, अनेक बडे व्यावसायिक यांच्या सदनिका, बंगले आहेत. त्यामुळे मार्चनंतर मे अखेरपर्यंत अनेक बडे लोक गोव्यात वास्तव्यासाठी असतात.

गोव्याच्या पर्यटनक्षेत्राला व्यावसायिक स्वरुप देण्याचे काम आता राज्य सरकारने करायला हवे. जेवढे पर्यटक गोव्याला भेट देतात, त्यामानाने पर्यटनाच्या क्षेत्रातून मिळणारा महसूल हा बराच कमी आहे. पर्यटन क्षेत्रातून बऱयापैकी महसूल प्राप्त करून त्याची जोड राज्याच्या तिजोरीला देणे शक्य आहे. गोव्यातील पर्यटन स्थळांचा विकास करून तिथे आवश्यक त्या साधनसुविधांची निर्मिती केल्यास त्याचा मोठा फ्ढायदा गोवा राज्याला होऊ शकतो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी उभारण्याची गरज आहे. त्यावर बारकाईने विचार होणे गरजेचे आहे. देशी पर्यटक आणि विदेशी पर्यटक यांच्या गरजा वेगळय़ा आहेत. त्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटनाचा मास्टरप्लॅन राज्य सरकारने तयार करायला हवा. राज्यात आज रस्ते, पूल, उड्डाणपूल यांची मोठय़ा प्रमाणात उभारणी सुरू आहे. मागील काही वर्षात गोव्याच्या विकासावर सुमारे 30 हजार कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. या साधनसुविधांची निर्मिती करतानाच पर्यटनाला पोषक ठरेल, अशा साधन-सुविधांचीही निर्मिती होणे गरजेचे आहे. सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आज महसूल उभारणी करून राज्याच्या तिजोरीला आवश्यक ते बळ देणे गरजेचे आहे कारण खाणबंदीच्या रुपाने महसुलाला मोठा फ्ढटका बसला आहे. अद्याप त्याला पर्याय तयार झालेला नाही. पर्यटन हा त्यासाठी चांगला पर्याय आहे पण त्यादृष्टीने पर्यटनाचीही उभारणी होणे गरजेचे आहे. गोव्यात बरीच अशी स्थळे आहेत, जी विकसित केल्यास सरकारला चांगला महसूल प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार प्राप्तीही होऊ शकते. जे व्यवसाय खाणबंदीमुळे कोलमडलेले आहेत, त्या व्यावसायिकांना त्यामुळे एक नवा आधार मिळू शकतो. त्याचबरोबर गोव्यातील सामाजिक अर्थव्यवस्थाही सांभाळली जाऊ शकते.

‘इको-टय़ुरिझम’ हा नवा कॉन्सेप्ट अनेक राज्यांनी स्वीकारलेला आहे. इको टय़ुरिझमच्या माध्यमातून वेगळय़ा प्रकारच्या पर्यटनाची उभारणी केली जात आहे. गोव्याकडे सुरुवातीपासूनच पर्यावरणदृष्टय़ा पर्यटक आकर्षित होतात, त्यामुळे इको टय़ुरिझम विकसित करणे गोव्याच्या दृष्टीने योग्य ठरू शकते. या अगोदर साळावली येथे ‘बोटॅनिकल गार्डन’ची स्थापना झालेली आहे मात्र त्याचा त्या पद्धतीने विकास झालेला नाही. अन्य धरण परिसरात त्याचबरोबर ग्रामीण आणि डोंगराळ भागात अशा पद्धतीचे पर्यटन विकसित करणे शक्य आहे मात्र त्यादृष्टीने सरकारच्या पर्यटन खात्याने तयारी करायला हवी.

राज्य सरकारचे पर्यटन खाते दरवर्षी कोटय़ावधी खर्च करून दौरे करते. मंत्री, अधिकाऱयांचा लवाजमा नातेवाईकांसह दौऱयावर जातो. आतापर्यंत एवढे दौरे झालेले आहेत आणि त्यावर प्रचंड मोठा खर्च झालेला आहे. या दौऱयावर कोटय़ावधीचा चुराडा केलेला आहे मात्र त्यातून राज्याला काडीचाही फ्ढायदा झालेला नाही. पर्यटनाचे अभ्यास दौरे आणि अनेक राज्यांमध्ये पर्यटनाची जाहिरात करण्यासाठी केलेला खर्च हा कुचकामी ठरलेला आहे. हा पैसा जर पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी खर्च केला असता तर त्याचा राज्याला प्रचंड मोठा फ्ढायदा झाला
असता.

महादेव खांडेकर