|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भक्तीचा भाव रे देणें घेणें

भक्तीचा भाव रे देणें घेणें 

अनेक वेळा विनंत्या करूनही देव कृपा करत नाही हा अनुभव आल्याने, तुकाराम महाराज देवाला डिवचत म्हणतात-

माझिया संचिता । दृढ देखोनि बळिवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आता तयाच्या ।तरि मज कळलासी। नव्हतां भेटी जाणीवेसी एका संपादिसी। मान करिसी येकाचा । तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें ।काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें । भोगाधिपति क्रियमाण। तें तुज नागवें अजून । तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा । तुज न होतां माझें कांहीं । परि मी न संडी भक्तीसोई। हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ।4। तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा। तुका म्हणे ऐसा । कांहीं न धरिं संकोच ।

तुकाराम महाराज देवाला म्हणतात-माझे प्रारब्ध अति बलाढय़ आहे, हे पाहून पंढरीनाथा, आता त्याच्या भीतीनें तू पळत आहेस. जोपर्यंत मला ज्ञानाचा योग नव्हता, तोपर्यंत तू मला समजला नव्हतास, परंतु आता कळून आलास. तू एकाची संपादणी करतोस म्हणजे एका संचिताला महत्त्व देतोस, एकाचा मान करतोस व आपलें महत्त्वही मिरवतोस. माझे प्रारब्ध हें फारच बळकट आहे, त्याच्यापुढे तुझे कांही चालत नाहीं. आता मी तुझ्यावर संकट काय म्हणून घालावे? भावी काळातील भोगांचा राजा, जें क्रियमाण अजून तुझ्या स्वाधीन होत नाहीं, असे जर आहे, तर मी तुला त्याच्या निवृत्तीकरतां व्यर्थ शीण कशाला द्यावा? तुझ्याकडून जरी माझे कांही कार्य होत नाही, तरी मी तुझ्या भक्तीचा मार्ग मात्र टाकणार नाही, मग मला कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही कुळांत, कोणताही जन्म मिळो. तूं माझे ठिकाणी असणाऱया दोषांस भीत आहेस, तसेच मी तुझ्याजवळ कांहीं मागेन, अशा कल्पनेने तूं भीत आहेस. पण ह्यांविषयींचा तूं मनात कांही संकोच धरूं नकोस. मी तुझ्याजवळ कांही मागणार नाही. मी आपली निष्काम भक्ती करीन.  निष्काम मन झालेले संतांचे देवापाशी कांहीच लौकिक मागणे नाही. तरीही भक्तांचे एक मागणे आहेच व ते देवच देऊ शकतो, म्हणूनच तुकाराम महाराज देवाला काय म्हणतात पहा- चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं। तरिच पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें । रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही । तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें । तुकाराम महाराज म्हणतात-देवा! तूं माझे चित्त घेऊन त्याच्या मोबदल्यात काय देशील? हे माझ्याजवळ अगोदर सांग. हे पंढरीराया! तरच मी तुझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार करीन. ज्यात मला नुकसान येईल असे मी कांहीच घेणार नाही. मला रिद्धी म्हणजे सकळ ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी ह्यांची कांही लालूच दाखवशील, तर त्यांची मला गरज नसून, तुझ्या मुक्तीचीही इच्छा नाही. तुला आम्ही चित्त द्यावे आणि तू आपला भक्तिभाव आम्हाला द्यावा, असाच तुमचा आमचा देवघेवीचा व्यवहार होईल.

Ad.  देवदत्त परुळेकर