|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चिकोत्रात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक

चिकोत्रात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक 

नववे आवर्तन 28 मे ऐवजी 2 जूनला

प्रतिनिधी/ सेनापती कापशी 

चिकोत्रा धरणामध्ये सध्या 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून शेवटचे पाणी 28 मे ऐवजी 2 जूनला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे 2 जून ते 11 जूनपर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. मान्सूनचे आगमन लांबणार असल्याची चिन्हे हवामान खात्याने वर्तवली असल्याने नववे आवर्तनही सहा दिवस पाण्याच्या नियोजनाकरीता पुढे ढकलले आहे.

चिकोत्रा धरणात गतवर्षी 2011 नंतर 100 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे चिकोत्रा खोऱयातील शेतकऱयांच्यासह सर्वांच्याच चेहऱयावर आनंद दिसत होता. सुरुवातीची पाच आवर्तने ही महिन्याने व त्यानंतर चार आवर्तने ही 22 दिवसांच्या अंतराने केली होती. चिकोत्रा खोऱयातील सुमारे 28 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. त्याबरोबरच शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्याकरीता पाटबंधारे खात्याची दमछाक होते. चिकोत्रा धरण हे केवळ दीड टीएमसी क्षमतेचे असून गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सर्व मोठमोठी धरणे भरल्यानंतर अखेरच्या टप्यात परतीच्या पावसाने हे धरण भरले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही उपसाबंदी कायम करण्यात आली होती.

नोव्हेंबर ते जून अखेर 9 पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले होते. उपसाबंदीच्या काळात काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागाने केले होते. सध्या धरणामध्ये आठ आवर्तनामध्ये 35 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. 2 जून रोजी नवव्या आवर्तनासाठी सोडण्यात येणारे पाणी 100 एमसीएफटीपेक्षा अधिक लागणार आहे. त्यामुळे धरणामध्ये अखेरीस 25 टक्केच्या जवळपास पाणी शिल्लक राहणार आहे. जर मान्सून लांबणीवर पडला तर चिकोत्रा नदीवर असणारे कोल्हापूर पध्दतीच्या 28 बंधाऱयांचे पूर्ण बरगे काढून पाणी सोडण्यात येणार आहे.  

चांगले नियोजन

गतवर्षी धरणामध्ये केवळ 62 टक्के पाणीसाठा झाला होता. तर त्यापूर्वी 61 टक्के पाणीसाठा झाला होता. 2013 नंतर धरणामध्ये दरवर्षीच 50 टक्केच्या जवळपास पाणीसाठा झाला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागली होती. कांहीवेळा अधिकारी व शेतकऱयांच्यामध्ये वादावादीही झाली. तरीसुध्दा या अडचणींवर मात करीत पाटबंधारे विभागाने हा सर्व अनुभव लक्षात घेवून यावेळी सुरुवातीला जमिनीमध्ये कमी पाणी लागते म्हणून महिन्याला एक असे पाच पाण्याचे नियोजन केले होते. तर जेंव्हा कडाक्याच्या उन्हाळ्यात पिके धोक्यात येतात म्हणून शेवटीची चार आवर्तने ही 22 दिवसांनी केल्याने चिकोत्रा खोऱयातील पिकांना तसे जीवदान मिळाले आहे. म्हणावी तितकी वाढ जरी झाली नसली तरी पिकांनी जीव धरुन ठेवलेला आहे.  

सध्या धरणामध्ये पाण्याचा साठा लक्षात घेवून वाढलेली प्रचंड उष्णता व मान्सूनही लांबला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून शेवटचे आवर्तन हे सहा दिवस उशिरा घेतले आहे. चिकोत्रा नदीवर काटेकोरपणे उपसाबंदी याहीवेळी करण्यात येणार आहे. त्याचे नियोजनही केले आहे, अशी माहिती उपअभियंता उत्तम कापसे यांनी दिली.