|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दुचाकी अपघातात खांबाळे ग्रा.पं.सदस्याचा मृत्यू

दुचाकी अपघातात खांबाळे ग्रा.पं.सदस्याचा मृत्यू 

वैभववाडीत दुचाकींची समोरासमोर टक्कर

दुसरा दुचाकीस्वारही गंभीर

वार्ताहर / वैभववाडी:

वैभववाडी-फोंडा मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहानजीक दुचाकींची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शंकर विठ्ठल बर्गे (62, रा. खांबाळे धनगरवाडी) हे जागीच ठार झाले. दुसरा दुचाकीस्वार सचिन पुंडलिक खांडेकर (35, रा. खांबाळे- मोहितेवाडी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडला. शंकर बर्गे हे खांबाळे ग्रा. पं. चे विद्यमान सदस्य होते.

अधिक माहिती अशी, शंकर बर्गे हे आपल्या प्लाटिना दुचाकीने वैभववाडीहून खांबाळे येथे जात होते. तर सचिन खांडेकर हा ऍक्टिव्हा दुचाकीने खांबाळेहून वैभववाडी येथे परतत होता. हे दोन्ही दुचाकीस्वार शहरातील विश्रामगृहानजीक आले असता त्यांच्या दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघात होताच शंकर बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. सचिन खांडेकर हादेखील गंभीर जखमी झाला. दोघांनाही स्थानिक ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, शंकर बर्गे हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी घोषित केले. सचिन खांडेकर याला प्राथमिक उपचारानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

खांबाळे गावावर शोककळा

शंकर बर्गे हे नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने निवृत्तीनंतर ते खांबाळे येथे गावी आले. सन 2017 मध्ये त्यांनी खांबाळे पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमान पक्षाच्यावतीने निवडणूक लढविली होती. ते खांबाळे ग्रा. पं. चे विद्यमान सदस्यही होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे खांबाळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.