|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » एक्झिट पोल बनावट, सतर्क अन् दक्ष रहा!

एक्झिट पोल बनावट, सतर्क अन् दक्ष रहा! 

राहुल गांधी यांची पक्ष कार्यकर्त्यांना सूचना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एक्झिट पोल्सना बनावट ठरवत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षकार्यकर्त्यांना सतर्क आणि दक्ष राहण्याची सूचना केली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा झटकण्यासाठी राहुल गांधी यांनीच कंबर कसली आहे. निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच राहुल यांनी ट्विट करत काँग्रेस कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वड्रा यांनी एका ध्वनिसंदेशाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याची सूचना केली होती.

पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. सतर्क आणि दक्ष रहा, घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. बनावट एक्झिट पोलच्या दुष्प्रचाराने निराश होऊ नका. स्वतःवर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा, तुमचे परिश्रम वाया जाणार नसल्याचे राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

प्रियंकांचा ध्वनिसंदेश

अफवा आणि एक्झिट पोलमुळे निराश होऊ नका. मतमोजणी होईपर्यंत कार्यकर्त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांवर ठाण मांडून बसा असे आवाहन प्रियंका वड्रा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.

भोपाळमध्ये देखरेख

अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या भोपाळ मतदारसंघाच्या स्ट्राँगरुमबाहेर ईव्हीएमवर करडी नजर ठेवली जातेय. भोपाळची एक चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून यात स्ट्राँगरुमबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळ ठोकल्याचे दिसून येते.

Related posts: