|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इंडोनेशियात हिंसक निदर्शने, 6 जण ठार

इंडोनेशियात हिंसक निदर्शने, 6 जण ठार 

राष्ट्रपती निवडणूक निकालाची पार्श्वभूमी : पराभूत उमेदवाराच्या समर्थकांकडून जाळपोळ

वृत्तसंस्था/  जकार्ता

जोको विदोदो पुन्हा राष्ट्रपतिपदी निवडून आले असून या निकालाच्या विरोधात इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये बुधवारी किमान 6 जणांचा मृत्यू झाला. तर 200 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येची पुष्टी जकार्ताचे गव्हर्नर अनीस बसवेडन यांनी दिली असून किमान 60 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मंगळवारी रात्री सुरू झालेल्या निदर्शनांनी बुधवारी सकाळी हिंसक वळण घेतले आहे. निवडणूक देखरेख यंत्रणा आणि निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाबाहेर जमलेल्या निदर्शकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. पोलिसांच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या जमावाने अनेक वाहने पेटवून दिली आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्राबोवो सुबियांतो यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या निदर्शनांच्या अखेरीस हिंसाचार झाला आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सांगत सुबियांतो यांनी निकालाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. सुमारे 32000 सैनिक दोन्ही निवडणूक यंत्रणांच्या मुख्यालयांना सुरक्षा प्रदान करत आहेत. सुमारे 1300 जण निदर्शने सुरू ठेवण्याच्या उद्देशाने मशिदींमध्ये राहत असल्याचे राष्ट्रीय पोलीस दलाचे प्रवक्ते डेडी प्रसेत्यो यांनी सांगितले आहे. अधिकाऱयांनी दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला असून कित्येक कट्टरवाद्यांना अटक केली आहे. 

निवडणूक आयोगाने 17 एप्रिल रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची मंगळवारी पुष्टी दिली होती. या पुष्टीनंतरच निदर्शने सुरू झाली असून त्यांना हिंसक वळण प्राप्त झाले आहे.