|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पॉवरगेम’वरच विंडीजची खरी भिस्त

पॉवरगेम’वरच विंडीजची खरी भिस्त 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आंद्रे रसेल, ख्रिस गेल यांच्यासारख्या ‘पॉवरगेम’ फलंदाजांच्या फटकेबाजीवरच विंडीजच्या सर्व आशाअपेक्षा यंदा अवलंबून असणार आहेत. विंडीजचे गतवैभव एव्हाना केव्हाच लयाला गेले आहे. त्यामुळे, त्यांना रसेल व गेलसारखे फलंदाज ऐन मोक्याच्या क्षणी मदतीला धावून येतील आणि सामने जिंकून देण्याचा सिलसिला सुरु करतील, अशी विंडीजला अपेक्षा आहे. वास्तविक, युनिव्हर्सल बॉस या टोपण नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत फारसा बहरात नव्हता. पण, कोणत्याही क्षणी मुसंडी मारुन वर येण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे. त्या तुलनेत रसेलने मात्र धमाकेदार फलंदाजी केली असून विंडीजला त्याच्याकडून विश्वचषकातही हीच अपेक्षा असणार आहे.

कार्लोस ब्रेथवेट व डॅरेन ब्रेव्हो यांच्यासारखे दिग्गज खेळाडू उत्तम योगदान देतील, अशी विंडीजची अपेक्षा असून युवा शेमरॉन हेतमेयरचा वनडे व टी-20 या दोन्ही क्रिकेट प्रकारात 100 पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट या संघाचा उत्साह वाढवणारा आहे. शाय होपसारखा उत्तम सलामीवीर असल्याने फलंदाजीत ही देखील त्यांची मजबुती ठरु शकते.

मागील काही वर्षात विंडीज क्रिकेटपटू आणि त्यांचे विंडीज क्रिकेट व्यवस्थापन मंडळात अनेक वाद अगदी पराकोटीला गेले असून त्याचा फटका त्यांच्या क्रिकेटला बसला आहे. याच पराकोटीच्या वादामुळे ख्रिस गेल, केरॉन पोलार्ड, डेव्हॉन ब्रेव्हो यांच्यासारखे दिग्गज खेळाडू काही वेळा संघात देखील नव्हते. याचा फटका त्यांना एकंदरीत वाटचालीत सहन करावा लागला आहे. पण, आता वर्ल्डकप संघात ख्रिस गेल अँड कंपनीचा समावेश असल्याने विंडीजला काही प्रमाणात आशाअपेक्षा आहेत.

इंग्लंडमधील पाटा स्वरुपाच्या खेळपट्टय़ा आणि तेथील छोटय़ा खेळपट्टय़ा याचा गेल, रसेलसारख्या फलंदाजांना अतिशय पुरेपूर वापर करुन घेता येईल. एरवी विंडीजचे फलंदाज कलात्मक खेळण्यापेक्षा उत्तूंग फटकेबाजी करण्यावर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे, येथे इंग्लंडच्या उन्हाळय़ात त्यांचा खेळ निश्चितच बहरु शकतो. अर्थात, काही प्रमाणात गुणवत्ता असली तरी वनडे मानांकन यादीत हा संघ थोडय़ाथोडक्या नव्हे तर चक्क सातव्या स्थानी फेकला गेला, ही दारुण वस्तुस्थिती आहे. आयसीसीच्या 8 संघांच्या यादीत बांगलादेशपेक्षा खाली असणे त्यांच्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. केवळ श्रीलंका व नवोदित अफगाणिस्तान हे दोनच संघ विंडीजपेक्षा खाली आहेत, असे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

तसे पाहता विंडीजचा संघ एकवेळ 1970 ते 1980 च्या दशकात सुपरपॉवर होता. 1975 व 1979 साली पहिल्या दोन विश्वचषकात त्यांनीच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. याशिवाय, पहिल्या सलग तिन्ही विश्वचषकात त्यांनीच अंतिम फेरी गाठली. पण, 1983 मध्ये भारताकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागणे त्यांच्या जिव्हारी लागले. त्यानंतर काही वर्षांच्या कालावधीत मात्र दिग्गज खेळाडू निवृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पडद्याआड जात राहिले आणि पाहता पाहता विंडीजचे गतवैभवही लयास गेले.

यंदा या विश्वचषकात ख्रिस गेल किती बहरणार, हे विंडीजसाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल. कॅरेबियन्सनी वर्ल्डकप जिंकायचा असेल तर ख्रिस गेलला सूर सापडणे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तो अपयशी ठरला तर रसेल, डॅरेन ब्रेव्हो, हेतमेयर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गेल बहरला तर मात्र विंडीजला किमान फलंदाजीत तरी चिंतेचे फारसे कारणच राहणार नाही. जेसॉन होल्डर व केमर रॉश इंग्लिश वातावरणात उत्तम योगदान देण्याची क्षमता राखून असतील तर रसेल उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीही करु शकतो. डावखुरा जलद गोलंदाज शेल्डॉन कॉट्रेलला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप ठसा उमटवायचा आहे. ऍश्ले नर्स हा एकमेव फिरकीपटू अनुभवी असून डावखुरा फिरकीपटू फॅबियन ऍलेनने केवळ 7 सामने खेळत त्यातही केवळ एकच बळी मिळवला आहे. दर्जेदार फिरकीच्या आघाडीवर हा संघ निष्प्रभच ठरला असून फलंदाजीत त्यांना आशाअपेक्षा आहेत. पण, प्रत्यक्षात फलंदाजीत ते एकाच वेळी प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडण्यात यशस्वी ठरणार का, हे प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यानच निश्चित होईल.

विंडीजचा संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, केमर रॉश, डॅरेन ब्रेव्हो, आंद्रे रसेल, शाय होप, शेल्डॉन कॉट्रेल, इव्हिन लुईस, शेनॉन गॅब्रिएल, कार्लोस ब्रेथवेट, ऍश्ले नर्स, शिमरॉन हेतमेयर, फॅबियन ऍलेन, ओशेन थॉमस, निकोलस पूरन.