|Sunday, September 22, 2019
You are here: Home » क्रिडा » केवळ विराटच विश्वचषक जिंकून देऊ शकणार नाही, सर्वांची साथ हवी

केवळ विराटच विश्वचषक जिंकून देऊ शकणार नाही, सर्वांची साथ हवी 

6 विश्वचषक खेळलेल्या सचिन तेंडुलकरचे प्रांजळ मत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मागील काही वर्षांपासून सातत्यपूर्ण फलंदाजी साकारत धावांचा रतीब रचत जाणे भारतीय कर्णधार व फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ विराट कोहलीसाठी नेहमीचे झाले आहे. पण, तो केवळ एकटाच विश्वचषक अजिबात जिंकून देऊ शकणार नाही, विश्वचषक जिंकण्यासाठी त्याला इतरांची देखील तितकीच साथ असायला हवी, असे प्रांजळ मत सचिन तेंडुलकरने मांडले. आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तो वृत्तसंस्थेशी बोलत होता.

कुलदीप यादव व यजुवेंद्र चहलची भूमिका, चौथ्या स्थानी फलंदाजी कोणी करावी आणि इंग्लंडमधील पाटा स्वरुपाच्या खेळपट्टय़ा गोलंदाजांना कशा मारक ठरत आहेत, यावर सचिनने सविस्तर भूमिका मांडली. सचिनने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत 6 विश्वचषक स्पर्धा खेळल्या असून यात 2011 विश्वचषक जेतेपदाचा तो साक्षीदार ठरला आहे.

‘प्रत्येक सामन्यात किमान दोन-एक खेळाडूंनी दमदार खेळी साकारणे महत्त्वाचेच असते. पण, सांघिक खेळाच्या बळावरच सामने जिंकता येत असतात. केवळ एकाच खेळाडूच्या बळावर कधीही स्पर्धा जिंकता येत नसते. सांघिक खेळ हाच यासाठी पाया असावा लागतो. महत्त्वाच्या क्षणी अन्य खेळाडूंनी अपेक्षित योगदान दिले नाही तर मात्र निराशाच पदरी येऊ शकते’, असे निरीक्षण त्याने पुढे मांडले.

भारतीय संघातर्फे चौथ्या स्थानी फलंदाजीला कोण येणार, हे अद्याप निश्चित होऊ शकले नसले तरी स्वतः सचिनला मात्र याची फारशी चिंता वाटत नाही. ‘चौथा हा केवळ क्रमांक आहे. मला या स्थानी कोण फलंदाजी करणार, याची फारशी चिंताच वाटत नाही. आपल्या खेळाडूंनी बरेच क्रिकेट खेळले आहे आणि चौथ्या, सहाव्या, आठव्या स्थानी फलंदाजीला उतरताना नेमकी कशी भूमिका, जबाबदारी पेलावी लागते, याची सर्वांना उत्तम जाणीव आहे. परिस्थितीनुसार फलंदाजी करणे, हाच सर्वांचा प्राधान्यक्रम असायला हवा’, असे वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱया या दिग्गज फलंदाजाने नमूद केले.

‘दोन्ही बाजूंनी नवे चेंडू आणि पाटा खेळपट्टय़ा यामुळे गोलंदाजांसाठी अतिशय प्रतिकूल स्थिती निर्माण झाली असून याचमुळे एक संघ 350 धावा झोडपतो आणि दुसरा संघ चक्क 45 षटकांमध्येच त्यांचा यशस्वी पाठलाग करतो, असे चित्र दिसून येत आहे. वनडे क्रिकेटमध्ये सध्या चेंडू रिव्हर्स स्विंग होताना दिसून येत नाही, हे चित्र निश्चितच निराशाजनक आहे. आम्ही खेळत असताना एकच नवा चेंडू असायचा आणि 28 ते 30 व्या षटकापासून तो रिव्हर्स स्विंग होत असे. पण, आता चेंडू बराच कठीण असतो आणि फलंदाज सहज वर्चस्व गाजवताना दिसून येत आहेत’, असे सचिन पुढे म्हणाला.

‘माझ्या मते एक तरी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टय़ा तयार करायला हव्यात. दोन नवे चेंडू वापरात असतील तर अशा खेळपट्टय़ा निर्णायक स्वरुपाच्या ठरतील. यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा भारतात बराच समाचार घेतला. पण, इंग्लंडमध्ये तसे करणे सहजसोपे अजिबात नसेल’, असे सचिन एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. मधल्या षटकात यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव महत्त्वाचे योगदान देतील, अशी अपेक्षा त्याने याप्रसंगी व्यक्त केली. यासाठी त्याने माजी लंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे उदाहरण दिले.

‘मुथय्या मुरलीधरन दोन प्रकारचे चेंडू टाकायचा. एक पारंपरिक ऑफ बेक अन् आणखी एक म्हणजे दुसरा. आता समोरचा फलंदाज हा चेंडू ओळखायचा नाही, असे अजिबात नाही. पण, तरीही त्याला बळी मिळत गेले’, असे 46 वर्षांच्या सचिनने पुढे नमूद केले. ‘चेंडूचा दर्जा ओळखण्यात अव्वल फलंदाजांकडूनही चूक होऊ शकते. चेंडू चार इंच वळेल, असा फलंदाजांचा अंदाज असतो, पण, तो चेंडू आठ इंच देखील वळू शकतो. मधली यष्टी व बाजूची यष्टी यातील अंतर दोन इंचांपेक्षाही कमी असते. त्यामुळे हा फरक विशेष महत्त्वाचा ठरु शकतो. एखादा चेंडू आऊटस्विंगर आहे, याची कल्पना असतानाही त्यावर बॅटची कड लागून तो मागे गेलेला असतो. अशा परिस्थितीत फलंदाजांच्या हाताशी फारसे काही रहात नाही’, असे सचिन पुढे म्हणाला. सध्याचा संघ अतिशय समतोल आहे, असेही त्याने नमूद केले. ‘अनुभवी व नवोदित अशा खेळाडूंचा उत्तम मिलाफ यंदा साधला गेला असून काही खेळाडूंना 8 ते 10 वर्षांचा अनुभव आहे तर कुलदीप, राहुल, चहल, हार्दिक पंडय़ा, जसप्रित बुमराह यांच्यासारखे काही नवोदित खेळाडू जागतिक दर्जाचेही आहेत, ही लक्षवेधी बाब आहे. सध्याचा संघ सर्वोत्तम आहे आणि याचमुळे मला आगामी विश्वचषकात त्यांच्याकडून विशेष अपेक्षा आहेत’, असे सचिनने शेवटी नमूद केले.