|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयाचा खासदार आज ठरणार

साताऱयाचा खासदार आज ठरणार 

उदयनराजे की नरेंद्र पाटील, दोन्ही बाजूकडे कमालीची उत्सुकता

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे भोसले हॅटट्रीकसाठी उत्सुक झाले असून बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला आव्हान दिलेले शिवसेना भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी प्रचारादरम्यान मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात केलेला नारा ही हॅटट्रिक तोडणार का? कोण होणार सातारचा खासदार? यासाठी जिल्हय़ात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आज होणाऱया मतमोजणी प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष असून गत एक महिन्यापासून सुरु असलेल्या चर्चांना आज कोण होणार साताऱयाचा खासदार याचे उत्तर मिळणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीचेच उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. अपवाद शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा. त्यावेळी प्रतापराव भोसले व उदयनराजे भोसले यांचा पराभव निंबाळकरांनी केला होता. परंतु, त्यानंतर राजकारणात बरेच बदल घडत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर या जिल्हय़ावर व जिल्हय़ातील सहकार, साखर कारखानदारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच कायम वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे जिल्हय़ात राष्ट्रवादीची ताकद ही निर्विवाद आहे.

गत दोन टर्म राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून उदयनराजे भोसले हे निवडून आले आहेत. 2014 साली देशभरात मोदी लाट असताना व त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडत असताना देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य घेवून उदयनराजे भोसले विजयी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत देखील उदयनराजेंचे चांगलेच वजन निर्माण झाले होते. सातारा लोकसभा मतदार संघावर उदयनराजेंचा असणारा वरचष्मा लक्षात घेवून व त्यांचे बंधु शिवेंद्रराजे भोसले यांची समजूत काढून उदयनराजेंना सलग तिसऱया वेळी खासदार बनण्याची संधी राष्ट्रवादीने दिली आहे.

मात्र, उदयनराजे भोसले यांच्याबद्दल मतदारसंघात काही ठिकाणी नाराजी असल्याचा अभ्यास करत शिवसेना भाजप युतीने नरेंद्र पाटील या रांगडय़ा गडय़ाला त्यांच्या विरोधात उभे केले. त्यामुळे प्रथमपासून एकतर्फी वाटणारी निवडणूक चांगलीच चुरशीची ठरलीय. पूर्वी 2009 व 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना एवढे आव्हान मिळाले नव्हते. ते मात्र यंदाच्या निवडणुकीत मिळाले.

आता सातारचा खासदार होणार कोण? याकडे राष्ट्रवादी व शिवसेना भाजपचे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. प्रशासन हे आपल्या परीने शक्य तितक्या शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडण्यासाठी सज्ज आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सातारचा खासदार कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळणार असून सातारच्या निकालाकडे राज्यभरातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.