|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खडतर परिस्थितीतही ते करताहेत नुकसानग्रस्तांना मदत

खडतर परिस्थितीतही ते करताहेत नुकसानग्रस्तांना मदत 

बेळगाव / प्रतिनिधी

ओडिसा येथे फनी वादळाच्या प्रकोपानंतर झालेली नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी बेळगावमधील विद्युत कर्मचारी तेथे पोहोचून कामाला लागले आहेत. याठिकाणी संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून खडतर परिस्थितीतही हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिन्या ओढणे, खांब बसविणे, अशी कामे करीत आहेत. रात्रंदिवस काम करून तेथील जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी काम करण्यात येत आहे.

बंगालच्या उपसागरातील फनी वादळानंतर ओडिसामध्ये जनजीवन विस्कळीत होऊन लाखो लोकांना स्थलांतरित करावे लागले. हे वादळ येऊन 15 दिवस उलटले तरी अद्याप परिसरामध्ये विद्युत पुरवठा बंद आहे. तसेच विद्युत खांब पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यामुळे ते पुन्हा उभारण्याचे काम हेस्कॉमचे कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहेत.

हेस्कॉमच्या 35 कर्मचाऱयांची टीम या कामासाठी ओडिसा येथे कार्यरत आहे. या टीमकडून एका गावाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. अजून आठवडाभर या कर्मचाऱयांना कामाची विभागणी करण्यात आल्याचे येथील कर्मचाऱयांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. एका साहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. यामध्ये बेळगाव शहर उपविभाग 1 चे कर्मचारी वाय. बी. पटोले यांचाही समावेश आहे.