|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आज फैसला ; दुपारनंतर निकालाची शक्यता

आज फैसला ; दुपारनंतर निकालाची शक्यता 

बेळगाव

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणेने संपूर्ण व्यवस्था सज्ज केली आहे. तांत्रिक प्रक्रियेमुळे मतमोजणीला विलंब लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून दुपारनंतर निकाल घोषित होण्याचा अंदाज आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे व्ही. एस. साधुन्नवर यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मतदारराजाचा कौल कोणत्या उमेदवारला मिळणार याविषयी अंदाजबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीयस्तरावरील एक्झिट पोलच्या अंदाजबांधणीने मतदारांचा कौल यापूर्वीच जाहीर केला आहे. त्याची सत्यता बेळगाव मतदारसंघासाठी योग्य ठरणार का या विषयीचे चित्र गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

निवडणूक निकालासाठी मतमोजणीची व्यवस्था येथील आरपीडी कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. त्याकरिता कॉलेजमधील वेगवेगळय़ा कक्षांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हय़ातील विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. लोकसभा मतदार संघाच्या कक्षेतील बेळगाव दक्षिण, उत्तर ग्रामीण, गोकाक, अरभावी, रामदुर्ग, सौंदत्ती आणि बैलहोंगल या आठ विधानसभा मतदार संघांच्या मतदानाची मतमोजणी येथे करण्यात येणार आहे. त्याकरिता परिपूर्ण दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून एकूण 57 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा फैसला गुरुवारी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली आहे. आता मतमोजणीची प्रक्रिया योग्यरितीने पार पाडण्याकरिता यंत्रणेने कंबर कसली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.