|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजीव गांधींच्या दूरदृष्टीकोनामुळेच आजचा डिजिटल भारत

राजीव गांधींच्या दूरदृष्टीकोनामुळेच आजचा डिजिटल भारत 

नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

एकविसाव्या शतकामध्ये भारताची विकसित देश म्हणून जगात ओळख करुन देण्यामध्ये राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळेच आजचा डिजिटल भारत आपण पाहत आहोत, असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी केले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते.

   दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने मंगळवारी शाहू स्मारक भवनमध्ये राजीव गांधी अभिवादन मेळावा आयोजित करण्यात आला होता. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे होते. डॉ. थोरात यांनी राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू भाषणातून उलगडले.

    भारत एकविसाव्या शतकामध्ये विकसित देश म्हणून नेण्यामध्ये राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या योगदानामुळे आजचा डिजिटल भारत आपण पाहत आहोत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्यांनी देशाच्या विकासाचं स्वप्न पाहीलं आणि जगात भारत हा महासत्ता कसा होईल, यादृष्टीनं प्रयत्न केले. देशहिताचे अनेक चांगले निर्णय त्यांनी दूरदृष्टीनं घेतले. पण यातही त्यांच्यावर केवळ राजकारणातून मोठी टीका झाली, हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होता. कॉंग्रेस पक्ष जनतेपासून दुरावत चालल्याची खंत त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात व्यक्त केली होती. पण यातून पक्षाने कोणताही बोध घेतलेला नाही. आज सुध्दा तीच परिस्थिती कायम आहे, असे थोरात यांनी परखडपणे बोलून दाखवले.. राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीमध्ये यापुढे तरी पक्षाने योगदान द्यावे, असे आवाहन थोरात यांनी केले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक तौफिक मुल्लाणी, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रकाश सातपुते, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, संध्या घोटणे, उपमहापौर भूपाल शेटे, सुरेश कुऱहाडे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.