|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर स्वच्छ करुन देशाला दाखवून देवू

शहर स्वच्छ करुन देशाला दाखवून देवू 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कचरा वर्गीकरण करा, ओल्या कचऱयापासून खत तयार करा, नाला व नदीच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड करा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. लोकसहभागातून शहर स्वच्छ करुन देशाला दाखवून देवू असेही त्यांनी सांगितले. महापालिकेकडून जयंती नाला स्वच्छतेच्या मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर टोल विरोधी कृती समितीसमीतीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.  महापौर सरीता मोरे अध्यक्षस्थानी होत्या.

 आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शहर स्वच्छता मोहीमेमध्ये पहिल्या दिवसापासून  नागरीक, बचतगट, स्वायत्त संस्था असे सर्व सहभागी झाले आहेत. त्यामध्ये आता कृती समितीही सहभागी झाली आहे. स्वच्छतेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये किती नंबर आला यापेक्षा बाहेरच्या नागरिकांनी कोल्हापूर किती स्वच्छ आहे, असे म्हटले पाहिजे. 

 आर्किटेक असोसिएशनचे अघ्यक्ष राजेंद्र सावंत म्हणाले, जयंती नाला हा नाला नाही तर ती जयंती व गोमती नदी आहे. नदीच्या पुनर्रजीवनसाठी शासनाकडून अनुदान मिळते. सध्या जयंती नाल्यातून 90 द.ल.ली पाणी वाहून नेले जाते. जयंती नाल्यामध्ये सध्या 217 लहान मोठया नाल्यातून सांडपाणी मिसळत आहे.

 अर्किटेक इंजिनियरचे माजी अध्यक्ष अजय कोराणे म्हणाले, जयंती नाला 100 टक्के प्रदूषण मुक्त होऊ शकतो. सध्या कोल्हापूरचा स्वच्छतेत देशात 16 वा क्रमांक आहे. तो देशात नंबर वन वर येण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत.

  प्राध्यापक मिलींद कारंजकर, किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक जयंत पाटील, राहूल चव्हाण, बाबा पार्टे, ऍड पंडितराव सडोलीकर, श्रीकांत भोसले, अमोल कुरणे, प्रसाद जाधव, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

  ‘कचरा लाख मोलाचा’

‘कचरा लाख मोलाचा’ही संकल्पना आणणार आहोत. आपण सर्वानी मिळून येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करुया, प्रत्येक कोल्हापूरकर महापालिकेसोबत राहतील, असा विश्वास आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी व्यक्त केला.

  जयंती नाला प्रदूषीत करणाऱयावर दंड करा

 जयंती नाला उगम ते पंचगंगा नदी संगमपर्यत प्रदूषणास कोणते घटक कारणीभूत आहेत हे पहावे लागेल. जयंती नाल प्रदूषीत करणाऱयांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना टोल विरोधी कृती समितीच्यावतीने करण्यात आली.  

 मॅन पॉवरचा वापर केल्यास पंचगंग प्रदूषणमुक्त

 जयंती व गोमती या नद्या होत्या. त्यांचे रुपांतर आता नाल्यामध्ये झाले असून यामुळे पंचगंगा नदी प्रदूषीत होत आहे. 50 टक्के पंचगंगा नदी शहरी भागातून प्रदूषीत होते. कोल्हापूरची जनता चागल्या कामास सदैव तयार असते. मॅन पॉवरचा वापर परिपूर्ण झाल्यास पंचगंगा नदी प्रदूषीत होणार नाही. सांडपाणी प्रोजेक्ट तयार करावेत व सांडपाण्याचा पुनर्वापर करुन हे पाणी नजीकच्या शेतीस, बागेस देऊन सांडपाणी निर्माणच होणार नाही याची काळजी घेऊया, असे टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवासराव साळोखे यांनी सांगितले.