|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लोंघे जवळ डिझेल टँकर पलटी

लोंघे जवळ डिझेल टँकर पलटी 

चार हजार लिटर डिझेल वाया : चालक जखमी

प्रतिनिधी / गगनबावडा

 कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे येथील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने डिझेल टँकर पलटी झाला. टँकरला गळती लागल्याने सुमारे चार हजार लिटर डिझेल वाया गेले. अपघातात चालक चरणसिंग नरसिंग दुबे जखमी झाला. मंगळवारी दुपारी पावणे तीन च्या सुमारास हा अपघात घडला.

   मिरज येथील डेपोतून कोकणात डिझेलचा पुरवठा होतो. या डेपोतून सकाळी सुमारे बारा हजार लिटर डिझेल घेऊन टँकर देवगडकडे चालला होता. दुपारी  लोंघे  येथील महादेव मंदीराजवळच्या धोकादायक वळणावर आला असता वळणाचा अंदाज न आल्याने डाव्या बाजूच्या दरडीवर पलटी झाला. यावेळी टँकरला गळती लागल्याने सुमारे चार हजार लिटर डिझेल वाया गेले. काही वेळाने अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर त्यांनी डिझेल गळती थांबवली. अपघातात टँकर चालक चरणसिंग  दुबे  गंभीर जखमी झाला. त्यांना कोल्हापूरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. गगनबावडा पोलीस व अग्निशामक दलाने क्रेनच्या साहाय्याने रात्री उशीरा टँकर बाहेर काढला. अपघाताची नोंद गगनबावडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

चालक अन्य जिल्हय़ातील त्रास स्थानिकांना

कोकणात दररोज सुमारे 20 टँकर डिझेल वाहतूक करतात. मात्र या टँकरवरील चालक अन्य जिह्यातील असतात. ते नेहमी बेकरदारपणे वाहन चालवतात. त्यांच्यात पुढे जाण्याची स्पर्धाच सुरू असते. त्यामुळे त्यांचा त्रास इतर वाहनधारकांना होतो. पोलीसांनी अशा चालकांना समज देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.