|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ट्रकखाली सापडून तरूण जागीच ठार

ट्रकखाली सापडून तरूण जागीच ठार 

उद्यमनगर येथील घटना – ट्रकचालकास अटक

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   उद्यमनगर येथील भारत बेकरी नजीक ट्रकच्या पाठीमागील चाकात सापडल्याने पादचारी ठार झाला. अमर आप्पासाहेब साळवी (वय 45 रा. शाहूपुरी 6 वी गल्ली) असे मृत कर्मचाऱयाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला. या घटनेमुळे घाबरलेल्या ट्रकचालकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पांडुरंग विष्णूपंत हवालदार (वय 42, रा. अतिवडे, ता. भुदरगड) असे ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली असून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अमर साळवी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका रिक्षातून उद्यमनगर येथील भारत बेकरीजनजीक उतरले. तेथून ते एका दुकानाकडे पायी चालत होते. यावेळी वाय पी. पोवारनगर चौकाकडून बिग बझारकडे एक ट्रक चालला होता. भारत बेकरी जवळ ट्रक आल्यानंतर ट्रकची धडक साळवी यांना बसली व ते पाठीमागील चाकाखाली अडकले. यामध्ये साळवी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जमाव पाहून ट्रकचालकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. साळवी काही वर्षापूर्वी महापालिकेत कर्मचारी होते. मात्र ते कामावर जात नव्हते. ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय असा परिवार आहे.