|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपचा दक्षिण कर्नाटक दिग्विजय

भाजपचा दक्षिण कर्नाटक दिग्विजय 

काँग्रेस-निजदच्या वर्चस्वाला सुरुंग : युतीचे दिग्गज चारीमुंडय़ा चीत, संपूर्ण राज्यात भाजपची लाट

प्रतिनिधी/ बेंगळूर

हुरहुर, चिंता आणि उत्सुकता लागलेल्या कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा निकाल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कर्नाटकात पुन्हा दिसून आला आहे. भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला आपले अस्तित्व गमवावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निजदचा प्रभावही जेमतेमच राहिला आहे. आतापर्यंत उत्तर कर्नाटकात वर्चस्व राखलेल्या भाजपने दक्षिण कर्नाटकातही कमळ फुलविले आहे.

राज्यातील 28 पैकी 25 जागांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले तर काँग्रेस आणि निजदला प्रत्येकी एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. मंडय़ा मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. 2014 मधील निवडणुकीत भाजपला 17, काँग्रेस 9 आणि निजदला 2 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपच्या जागांमध्ये तब्बल 8 जागांची भर पडली आहे. त्या 8 जागांपैकी 7 जागा मागील निवडणुकीत काँग्रेसच्या आणि एक जागा निजदची होती.

भाजपला अधिक जागा मिळण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने निधर्मी जनता दलाशी केलेली युती फळली नाही. उलट राज्यातील मतदारांनी युतीला झिडकारले आहे. परिणामी, काँग्रेसमधील मल्लिकार्जुन खर्गे, विरप्पा मोईली, के. एच. मुनियप्पा, निजद सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना चारीमुंडय़ा चीत व्हावे लागले आहे.

दक्षिण कर्नाटक भागातील चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, तुमकूर, कोलार यासह जुने म्हैसूर भागात काँग्रेस आणि निजदचे प्राबल्य आहे. मात्र, या भागातही भाजपने झेंडा फडकवून आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. जागा वाटप आणि राज्यातील युतीमधील अंतर्गत कलहाला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला स्पष्टपणे नाकारले आहे, हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.