|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गोव्यात भाजप सरकार बनले मजबूत!

गोव्यात भाजप सरकार बनले मजबूत! 

लोकसभेच्या दोन जागा गोव्यात आहेत. त्यातील एका जागेवर भाजपला घवघवीत यश मिळणार हे ठरलेलेच होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विजयी झाले व दुसरे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांचा दक्षिणेत पराभव झाला, मात्र दक्षिणेतही भाजपने चांगलीच झुंज दिलेली आहे. गोव्यातील या निवडणुकीने राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येणार असल्याने आता प्रशासन मजबूत बनविण्याच्या दृष्टीने डॉ. प्रमोद सावंत यांना महत्त्वाची पावले उचलावी लागतील. भाजपचे सरकार गोव्यात आता मजबूत अवस्थेत पोहोचले हीच खरी तर फलश्रुती आहे.

गोव्यातील विधानसभेच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 3 जागांवर विजय मिळवला खरा, परंतु पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेच्या व भाजपच्या बालेकिल्ल्यात पर्रीकरांच्या मतदारसंघातच भाजपचा दणदणीत पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का ठरणारा आहे. गोव्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच 3 मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणुका झाल्या होत्या. माजी मुख्यमंत्री मनोहर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजधानी पणजी शहरातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणे भाजपच्या जिव्हारी लागलेले आहे. राज्यात मागील म्हणजेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला 13 आमदारांचे बळ प्राप्त झाले होते व विरोधी काँग्रेसला 17 जागांचे बळ प्राप्त झाले होते. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 सदस्यांची गरज होती. केंद्रात भाजप सरकार सत्तेवर असताना काँग्रेसमुक्त भारत अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगितले. भाजपला 3 अपक्ष, मगो पक्षाचे 3 व गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आमदारांचे बळ प्राप्त झाले व राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. या सरकारमध्ये नंतर काँग्रेसनेते विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करत ते राज्याचे आरोग्यमंत्री बनले.मात्र 2018 मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करोगाने आजारी पडले. त्याचबरोबर आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे देखील आजारी पडले आणि पर्रीकर सरकार डळमळीत झाले. आणखी दोन भाजप आमदार आजारी पडले व त्यातून जनतेची गोची झाली. 2019 च्या प्रारंभी फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले आणि 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रीकर यांनी शेवटचा श्वास घेतला. दरम्यान, गोव्यात भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फोडून शिरोडय़ाचे सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे दयानंद सोपटे हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीबरोबरच डिसोझा यांच्या म्हापसा, सोपटे यांच्या मांद्रे व शिरोडकर यांच्या शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या.

या दरम्यान मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले व सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले. या सरकारने विश्वासदर्शक ठराव लागलीच संमत केला, खरा परंतु सभागृहात केवळ 36 सदस्य होते व भाजपला 20 सदस्यांचे पाठबळ होते.

भाजपने नंतर मगो पक्षात विभाजन करून मंत्री बाबू आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर यांना मध्यरात्रीच पक्षात घेतले आणि मगोनेते सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकून मगोतून फुटून आलेल्या दीपक पाऊसकर यांना मंत्री बनविले, आजगावकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले.  तथापि, हे सरकार काठावर होते. 11 एप्रिल रोजी एकाचवेळी लोकसभा व विधानसभेच्या तीन जागांवर निवडणुका झाल्या या अत्यंत अडचणीच्या अशा जागा ज्या ठिकाणी भाजपसमोर फार मोठे आव्हान होते, मात्र त्या तिन्ही जागांवर विजय प्राप्त करून भाजपने गोव्यात आपले सरकार मजबूत अवस्थेत आणले
आहे.

पणजीत भाजपचा धक्कादायक पराभव…

पणजीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला. भाजपला या निवडणुकीत विजय महत्त्वाचा होता. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले नसते तर राज्यात भाजपला सरकार चालविणे कठीण होते, मात्र केंद्रात जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा परिणामही राज्यात सरकारवर व या सरकारला पाठिंबा देणाऱया घटक पक्षांवर झाला आणि घटक पक्षांनी आपण एनडीएबरोबरच राहू, असे लागलीच जाहीर केले.

सागर जावडेकर