|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘कमळा’च्या दलदलीत रुतणार सरकार?

‘कमळा’च्या दलदलीत रुतणार सरकार? 

या निकालाने युती सरकारला घरघर लागली आहे. असंगाशी संग काँग्रेसला भोवणार, हे स्पष्ट आहे.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते राजीनामा देण्याची घोषणा करणार की आणखी चालेल तितके दिवस युतीचा रथ हाकण्याचा प्रयत्न करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात युतीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. या धक्कादायक निकालाचे सावट युती सरकारवरही पडणार आहे. माजी पंतप्रधान  देवेगौडा, मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी आदींसह अनेक मातब्बरांना मतदारांनी डावलले आहे. मंडय़ा लोकसभेचा निकाल काय असणार? निखिल कुमारस्वामी विजयी होणार का? की सुमलता अंबरिश यांना मतदारांची सहानुभूती मिळणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निखिलसाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी, त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री, सात आमदारांनी कंबर कसली होती. मात्र, सत्तेपुढे सहानुभूती सरस ठरली. सुरुवातीपासूनच निखिल आणि सुमलता यांच्यात 500 ते हजार मतांच्या अंतरावर घासाघीस सुरू होती. दुपारनंतर सुमलता यांचे मताधिक्मय वाढत गेले. अखेर त्या विजयी झाल्या.

गुरुवारी 23 मे रोजी कर्नाटकात काँग्रेस-निजद युतीची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना वर्षपूर्तीचा आनंद घेता आला नाही. केवळ कर्नाटकातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात मुत्सद्दी राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी पंतप्रधान देवेगौडा, कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांचा पराभव झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा प्रज्ज्वल मात्र विक्रमी मतांनी विजयी झाला. गेली पाच वर्षे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांना टक्कर देणारे मल्लिकार्जुन खर्गे यांचा दारुण पराभव झाला. खर्गे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तब्बल अकरावेळा विजयी झाले आहेत. कदाचित ही त्यांची शेवटची निवडणूक होती. त्यांचाच शिष्य डॉ. उमेश जाधव यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमधून नशीब आजमावले आणि पहिल्याच प्रयत्नात ते विजयी ठरले. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चिंचोळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. अविनाश जाधव विजयी झाले. डॉ. अविनाश हे उमेश जाधव यांचे चिरंजीव. डॉ. अविनाश यांच्या विजयाने भाजपचे संख्याबळ 105 वर पोहोचले आहे. त्यामुळे साहजिकच भाजप नेत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मंत्री सी. एस. शिवळ्ळी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कुंदगोळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी विजयी झाली आहे. या मतदारसंघातही सहानुभूती कामाला आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेस 9 तर निजदला 2 जागा मिळाल्या होत्या. एकटय़ा भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. खरेतर सुमलता अंबरिश या भाजप पुरस्कृत उमेदवार होत्या. या यादीत सुमलता यांच्या नावाचा समावेश केला तर हा आकडा 26 वर पोचतो. उरल्या केवळ दोन जागा. डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे कर्नाटकातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले आहेत. तर प्रज्ज्वल रेवण्णा हे निजदचे एकमेव खासदार ठरले आहेत. या निकालामुळे काँग्रेस-निजद नेत्यांना जबर धक्का बसला आहे. युती तोडा नपेक्षा निजद नेते काँग्रेसला संपवतील, अशी मागणी गेल्या तीन महिन्यांपासून काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांनी सुरू केली होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही हायकमांडला असाच सल्ला दिला होता. 23 तारखेपर्यंत थांबा असा सबुरीचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला होता. या निकालानंतर युतीतून बाहेर पडा, असा सूर वाढला आहे.

येडियुराप्पांचा इशारा

येडियुराप्पा यांनी विधानसभेत भाषण केले. डी. के. शिवकुमार यांना उद्देशून ‘शिवकुमार शहाणे व्हा, हे बाप-लेक तुमच्या पक्षाला कधी संपवतील, याचा नेम नाही. आघात होण्याआधीच यातून बाहेर पडा’ असा सल्ला दिला होता. गुरुवारी निवडणूक निकालानंतर या भाषणाचा व्हीडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. या निकालाने युती सरकारला घरघर लागली आहे. आता ‘ऑपरेशन कमळ’चे प्रयत्न जोर पकडणार आहेत.

रमेश हिरेमठ