|Thursday, September 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची नांदी!

काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची नांदी! 

वंचित बहुजन आघाडीला हलक्यात घेणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भलतेच भोवले आहे. युती आणि आघाडीतील मताधिक्क्याच्या फरका इतकी मते वंचितच्या उमेदवारांनी घेतली आहेत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची शक्यता भाजप-शिवसेनेच्या यशामुळे  निर्माण झाली आहे.

सलग दुसऱया लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा दारूण पराभव करत भाजप आणि शिवसेनेने राज्यावरील पकड अधिक मजबूत केली आहे. भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5 आणि काँग्रेसने अवघी एक जागा जिंकली आहे. औरंगाबादच्या निवडणुकीत ‘खान की बाण’ फैसला अतितटीवर आहे. महायुतीने अपेक्षेपेक्षाही अधिक चांगली कामगिरी करताना खुद्द पवारांचे नातू आणि ज्यांच्यासाठी अजितदादांनी शक्ती पणाला लावली, शरद पवारांना माघार घ्यावी लागली ते पार्थ पवार पराभूत झाले आहेत. गतवेळपेक्षा एक जादा जागा घेऊनही राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे यश काळवंडले आहे. तर अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्यांचा पुरस्कार उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केला होता ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा, माजी अध्यक्ष संजय निरूपम, पुण्याचे शहराध्यक्ष मोहन जोशी, माजी खासदार प्रिया दत्त अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची फळी घरात बसली आहे. गत निवडणुकीत काँग्रेसची लाज राखलेल्या अशोक चव्हाणांचा पराभव हा काँग्रेसला मोठा धक्का आहे. औरंगाबादच्या उमेदवाराची अनामतही काँग्रेस वाचवू शकली नाही. चंद्रपूरमधून निवडून आलेले एकमेव उमेदवार सुरेश धानोरकर यांनी काँग्रेसची लाज राखली आहे. शिवसेनेची आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये येत त्यांनी भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव करून भाजपला एकमेव असा धक्का दिला. विशेष म्हणजे धानोरकर यांना डावलून भलत्याचीच काँगेसने उमेदवारी जाहीर केली होती. तिथे अशोक चव्हाणांना राजीनाम्याची धमकी देऊन तिकीट आणावे लागले. या एकमेव उमेदवाराने काँग्रेसला शून्यावर जाण्यापासून वाचवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणी पराभूत झाले तरीही त्यांच्या पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासहीतच्या मित्रपक्षाला जोराचा दणका दिला आहे. ही भाजपची ब टीम असल्याचे नेत्यांचे म्हणणे खरे ठरले. तरीही फायदा कोणाचाही होवो पण कधीतरी वंचितांची आघाडी निर्माण झाली पाहिजे हा विचार मांडणारे आंबेडकर आपले उपद्रवमूल्य दाखवण्यात यशस्वी ठरले. इचलकरंजीमध्ये राजू शेट्टी यांना कमी पडलेली लाखभर मते वंचितच्या उमेदवाराने घेतली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या पराभवास 1 लाख 58 हजार मते घेणारे वंचितचे भिंगे हे कारणीभूत ठरले आहेत. दोन पक्षप्रमुखांना याचा फटका बसला तसाच फटका खुद्द आंबेडकर यांना अकोल्यात बसला. त्यांना कमी पडणारी मते काँग्रेसच्या हिदायत पटेल यांनी घेतली तर सुशीलकुमार शिंदे आणि आंबेडकर यांच्या मतांची बेरीज केली तर भाजपचे सोलापूरचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी विजयी झालेच नसते हेही स्पष्ट झाले आहे. महास्वामींच्या निमित्ताने एक आध्यात्मिक व्यक्ती खासदार बनल्याचे महाराष्ट्राने अनुभवले आहे. गडचिरोली, यवतमाळ-वाशिम, माढा, सांगली, परभणी, रामटेक, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, शिर्डी, रायगड, पालघर, भिवंडी या मतदारसंघांमधीलही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवात वंचित आघाडीचा मोठा हातभार लागला आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीचा आकडाही घडला आहे. विधानसभेला तब्बल 50 मतदार संघात वंचित महाआघाडीला झटका देऊ शकते हे यातून सिध्द झाले आहे.

शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर भाजपशी जुळते घेतल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती. मात्र भाजपच्या झंझावातापुढे देशातील इतर नेत्यांची झालेली वाताहत लक्षात घेता उध्दव ठाकरे यांनी चाणाक्षपणे आपले 18 खासदार निवडून आणून पक्षाला प्रवाहात राखले आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मंत्री आनंदराव आडसूळ, शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव सोसावा लागला तर परभणी, उस्मानाबाद आणि मुख्यतः मावळ हे राष्ट्रवादी हिसकावून घेऊ इच्छिणारे मतदारसंघ राखून पुरता पैरा फेडला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची विजयाच्या बाबतीतही सही सही कॉपी करून महाराष्ट्रात प्रो इन्कंबन्सी वारे होते हे सिध्द केले आहे. महादुष्काळ, मराठा, धनगर आरक्षण, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी यासह सर्वच मुद्यांवर भाजपने मात करत यशाचा झेंडा राज्याच्या सर्व विभागात रोवला आहे. भाजप मंत्र्यांनी एकजुटीने पार पाडलेली जबाबदारी आणि संघटनात्मक यश नजरेत भरणारे आहे. राज्याच्या निवडणुकीत त्यामुळे भाजप अधिक प्रबळ झाला आहे.

राज्यातील काँग्रेस नेते आपल्याच तोऱयात राहिले, सहा महिने चर्चा करूनही ते विखेंच्या जागेचा तिढा सोडवू शकले नाहीत. औरंगाबादेतील अब्दुल सत्तारना थांबवू शकले नाहीत. सांगलीत दादा घराण्याच्या वारसाला पक्षाचे चिन्ह देऊ शकले नाहीत. गत सत्तेत सर्वाधिक मदत ज्या रणजितसिंह निंबाळकरांना केली त्यांना माढय़ातून भाजपचे खासदार होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांना मदत करणाऱया जयकुमार गोरे यांना थांबवता आले नाही की राधाकृष्ण विखे पाटलांना सांभाळू शकले नाहीत. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यास राज्यातील नेत्यांचे पक्ष संघटन उद्ध्वस्त करणारे धोरण कारणीभूत ठरले आहे.

राज ठाकरेंचा व्हिडीओ बॉम्ब फुस्स!

‘ए लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षाही ‘होपफूल प्रचार’ केलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्हिडीओ बॉम्ब फुस्स ठरले आहेत. त्यांनी सभा घेतली तेथे एकही उमेदवार विजयी झालेला नाही. हा निकाल अनाकलनीय आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली आहे. मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पेढा भरवत मोठा भाऊ ठरवले.

शिवराज काटकर