|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एक्झॅक्ट पोल

एक्झॅक्ट पोल 

पहाट झाली. मोरु उठला. उठला म्हणजे झोपेतून नव्हे. फेसबुकवरून उठला. रात्रभर मोरु आणि नारू जागेच होते. आपल्याला घरातून बाहेर पडून दोघे एका हॉटेलात भेटून चहापान आणि धुम्रपान करून परतले. गेले दोन दिवस टीव्हीवर एक्झिट पोलचा धुमाकूळ झाला. आज एक्झॅक्ट पोल होता.

मोऱया आणि नाऱया जिवलग मित्र, पण एकमेकांच्या विरुद्ध पक्षात होते. सोशल मीडियावर एकमेकांशी खच्चून भांडत. मोरुच्या मते इथे लिहिल्यावर नाऱयाला प्रत्येक पोस्टचे 40 पैसे मिळतात. नारुच्या मते याच कामासाठी मोऱयाला देखील पैसे मिळतात. ‘तुमच्या पक्षाने सत्तर वर्षे खाल्ले’ असं नाऱया म्हणाला की, ‘तुम्ही पाच वर्षात त्यातला किती जणांना पकडलंत?’ असं मोऱया विचारायचा. दोघे मित्र असल्याने त्यांच्यातली भांडणं टोकाला गेली नाहीत. पण सोशल मीडियावर अनेकांची एकमेकांच्या मित्रांना, भांडताना, आप्तांना शिवीगाळ केली होती, कायमचे संबंध तोडले होते. एक्झिट पोलमध्ये नाऱयाची पार्टी जिंकली होती. नाऱयाने तशी पोस्ट लिहिल्यावर मोऱयाने कमेंट केली होती की, सोनोग्राफीने केलेलं गर्भाचं लिंगनिदान अचूक असतं. पण एक्झिट पोल काही सोनोग्राफीसारखे अचूक नसतात.

कुरुक्षेत्रावर वस्त्रs टाकून हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला कृष्णाने समजावले की समोर तुझे नातलग असले तरी त्यांच्यावर शस्त्र चालव. पण मात्र तो प्रसंग वेगळा होता. पवाराच्या निवडणुकीत मात्र एरव्ही ज्यांना आयुष्ये एकत्र काढायची आहेत असे लोक एकमेकांशी भांडायला उठले. शिवीगाळ केली. एकमेकांची उणीदुणी काढली. प्रचाराची निम्नतम पातळी गाठली. नेतेदेखील यात पुढे होते. त्यांचे पाहूनच कार्यकर्ते आणि सोशल मीडियावरच्या रिकामटेकडय़ांनी आपापसात युद्धे खेळली, पैजा लावल्या. एकमेकांच्या नात्यांमध्ये विष कालवले.

एक्झॅक्ट पोल सुरू झाल्यावर मोऱयाचा चेहरा पडत गेला. नाऱया खुशीत होता. मोऱयाला दुःखामुळे जेवण गेलं नाही. नाऱया इतका हर्षभरित-उत्तेजित होता की त्याचं जेवणाकडे लक्ष नव्हतं. काल जागरण केलेलं असूनही आणि अस्सल पुणेकर असूनही दोघे दुपारभर जागे राहिले. अंतिम निकाल ऐकल्यावर घरातून निघाले. हॉटेलात भेटले.

‘चला आता अभ्यासाला सुरुवात, सोमवारी नोकरीसाठी इंटरव्हय़ूचा कॉल आलाय,’ मोऱया म्हणाला.

‘मी बँकेत लोनचं प्रपोजल दिलंय, त्यांनीही सोमवारी बोलावलंय,’ नाऱया म्हणाला. दोघांच्या आयुष्यातला राजकीय चर्चांचा अनुत्पादक बोळा निघाला होता. आयुष्ये मार्गी लागत होती.