|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मोदींचा ‘अश्वमेध’

मोदींचा ‘अश्वमेध’ 

इतिहास नेहमी जेत्यांकडून लिहिला जातो आणि तोच प्रमाण मानला जातो. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या देदीप्यमान विजयाचे चित्र पाहता तो आता भाजपकडून लिहिला जाईल. 1984 मध्ये दोन खासदारांवरून  भाजपने 282 जागांवर मारलेली उडी व तिथून त्यांनी या निवडणुकीपर्यंत गाठलेला 300 चा पल्ला, काँग्रेसचे पानिपत, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना शिकवलेला धडा, उत्तर प्रदेशसह  हिंदी भाषिक प्रदेश, पूर्वोत्तर राज्ये, बंगाल, केरळ, तामिळनाडू वगळता दक्षिणेत मारलेली मुसंडी, वाजपेयी-अडवाणी यांच्यानंतर मोदी-शहांचे नेतृत्व, दहा वर्षे सत्तेतील सुवर्णकाळ असा इतिहास निश्चितपणे भाजपकडून आता लिहिला जाईल. स्वतःच्या करिष्म्यावर आपल्या पक्षाला निवडणूक जिंकून देणारे आणि जनमानसावर गारूड घालणारे नरेंद्र मोदी हे पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्यानंतर देशातील पहिलेच नेते ठरले. ‘इंदिरा हटाओ’ चा नारा देत 1971 च्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात अशीच मोट बांधली होती. या निवडणुकीत ‘मोदी हटाओ’ ही विरोधकांची घोषणा होती. शब्दाने भावनेला हात घालण्याची कला  इंदिरा गांधींना अवगत होती. त्यावेळी ‘इंदिरा हटाओ’ला  ‘गरिबी हटाओ’ असे जबरदस्त  प्रत्युत्तर  इंदिरा गांधींनी दिले. अन्न, निवारा आणि रोजगाराच्या अपेक्षेने पाहणाऱया जनसमुदायाला त्यांच्या या घोषणेने काळजाला हात घातला. इंदिरा गांधींनी स्वतःच्या करिष्म्यावर 352 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला. नरेंद्र मोदींच्या  हुकूमशाहीवर आरोप करत ‘मोदी हटाओ’चे असेच आवाहन देशातील सर्व विरोधकांनी केले खरे. पण जनभावनेची नस ओळखणाऱया मोदींनी ‘मोदी हटाओ’ला ‘भ्रष्टाचार हटाओ…’ असे जबरदस्त उत्तर दिले. इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाओ’प्रमाणेच मोदींच्या या प्रत्युत्तराची देशभर लाट उमटली. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर  पाकिस्तानमधील बालाकोटवरील प्रतिहल्ला या दोन घटना मोदी लाटेच्या केंद्रस्थानी राहिल्या. पाकिस्तान ही भारतीय जनतेची ठसठसती जखम आहे. तिथे कुणी स्पर्श केला तर भारतीय मन कळवळते,  हा इतिहास आहे. मग ते पाकिस्तान विरूद्धचे युद्ध असो, क्रिकेट सामना असो अथवा कलाकार, गायकांचा मुद्दा असो. निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा हल्ल्याचा बदला मोदींनी ज्या संतापाने व तडफेने घेतला त्याचवेळी भारतीय जनतेने आपल्या मताचे दान त्यांच्या पारडय़ात टाकले होते. देशाला या कठीण प्रसंगी सुरक्षित ठेवणारा मोदींच्या उंचीचा पोलादी नेता विरोधकांकडे नाही, हे पटवून देण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. राष्ट्रवाद आणि विकास यांचा सुरेख मेळ घालत मोदींनी विरोधकांना अक्षरशः पाणी पाजले. नेतृत्व, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक विकास आदी मुद्दे मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. इव्हीएमबाबतची साशंकता, हिंदू दहशतवाद, चारित्र्यहनन, हिंसाचार या मुद्दय़ांमुळे ही निवडणूक अतिशय गाजली खरी, परंतु नरेंद्र मोदींनी ही सर्व परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. एका बाजूला पुलवामाच्या पार्श्वभूमीवर वीरश्रीने व संतापाने खदखदलेल्या भाषणाने लोकांच्या काळजाचा त्यांनी ठाव घेतला तर दुसऱया बाजूला निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये उडालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भगवी वस्त्रs धारण करून केदारनाथच्या गुहेमध्ये केलेल्या ध्यानधारणेमुळे त्यांच्यातील वैराग्य आणि संन्यस्त वृत्तीचे दर्शन झाले. भारतीय संस्कृतीला वीरश्री आणि वैराग्याचे आकर्षण आहे. इथेच मोदी जिंकले. युपीए आघाडीने 2014 च्या तुलनेने तीळभर सरस कामगिरी केली. पंजाब, केरळ आणि तमिळनाडूत भाजपला रोखण्यात त्यांना यश आले. भाजपला पर्याय म्हणून देशव्यापी काँग्रेसकडे पाहिले जाते. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसची पडझड नव्हे तर आता ढासळणे सुरू झाले आहे. ज्या राज्यात काँग्रेसने 2018 च्या विधानसभेसाठी चांगली कामगिरी केली त्याच कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये त्यांची लोकसभेसाठी अत्यंत खराब कामगिरी झाली. केवळ 5-6 महिन्यातच तेथील चित्र बदलले. उत्तर प्रदेशकडे सर्वांचे लक्ष होते. मोदी आणि शहांनीदेखील सर्वाधिक लक्ष येथे केंद्रीत केले होते. गत निवडणुकीपेक्षा भाजपला यंदा कमी यश मिळाले असले तरी, 50 टक्के मताचा वाटा उचलला असून, मोदी फॅक्टरमुळे तेथील जातीय समीकरणे गळून पडली आहेत.  बंगालमधील भाजपची मुसंडी ममता यांना अंतर्मुख करणारी आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि निजदला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे. देवेगौडा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव कर्नाटकातील काँग्रेस-निजद यांच्या राज्यातील सत्तेला धोक्याचा इशारा आहे.  युतीने महाराष्ट्रातून काँग्रेसला अक्षरशः उखडून टाकले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने तिसरी आघाडी केली असती तर चित्र वेगळे दिसले असते. मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी सेना-भाजप युतीने या ठिकाणी राजकीय शहाणपणा दाखवला. राजकारणात  मानभंग किंवा प्रतिष्ठाभंग हा चिरकाल टिकणारा नसतो. सत्तासंपादनासाठी विजयी होणे हेच अंतिम सत्य असते, असे अमित शहांनी म्हटले होते. त्याप्रमाणे भाजपने देशातील विविध प्रादेशिक पक्षांशी आघाडय़ा करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. त्यासाठी अमित शहांच्या राजकीय व्यवस्थापन आणि नियोजनाला दाद द्यावी लागेल. सारांश, मोदींच्या विजयाच्या वारूने अखेर भारताच्या चारही दिशा पादाक्रांत केल्या. अशा तऱहेने मोदींचा सत्तासंपादनाचा अश्वमेध पूर्ण झाला असेच म्हणावे लागेल.