|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘महागठबंधन’चे मनसुबे उद्ध्वस्त

‘महागठबंधन’चे मनसुबे उद्ध्वस्त 

रालोआ’च्या जागा घटल्या, तरी भाजपची दमदार कामगिरी

उत्तर  प्रदेशमध्ये यावेळी काय घडते याकडे साऱया भारताचे लक्ष लागून राहिले होते आणि त्याला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांनी एकत्र येत भारतीय जनता पक्षासमोर उभे केलेले आव्हान कारणीभूत होते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त अशी प्रभावी कामगिरी करण्यात यश मिळविले असून ‘रालोआ’ने 80 पैकी 60 जागांवर मुसंडी मारली आहे, तर सप-बसप-रालोद (राष्ट्रीय लोकदल) ‘महागठबंधन’वर केवळ 17 जागांवर समाधान मानण्याची वेळ आली आहे. काँग्रेसची तर अगदीच बिकट परिस्थिती झालेली असून त्यांच्या वाटय़ाला एकच जागा आली आहे. 

2014 मध्ये ‘रालोआ’ला 73 जागा मिळाल्या होत्या. त्याच्या तुलनेत त्यांची कामगिरी घसरलेली असली, तरी एकंदर परिस्थितीचा विचार करता ती खूपच चांगली राहिलेली आहे. 59 जागा जिंकलेल्या भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 2014 च्या तुलनेत 42.6 टक्क्यांवरून 49 टक्क्यांवर पोहोचली आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये तर पक्षाने प्रभावी यश मिळवून दाखविले असून त्याचे सर्वांत चांगले उदाहरण अमेठी हे आहे. या मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान जड जाऊन त्यांच्यावर मात खाण्याची नामुष्की आली.

नरेंद्र मोदी ‘फॅक्टर’ वरचढ

उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी या घटकाने ‘सप’ व ‘बसपा’ यांचा ज्याच्यावर भर होता त्या जातीच्या समीकरणांना उधळून लावले आहे. दलित आणि बिगर-यादव इतर मागासवर्गीय हे भाजपच्या मागे मोठय़ा प्रमाणात उभे राहिल्याचे दिसून येत आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या साऱयाच नेत्यांनी विजयी वाटचाल राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीहून 4 लाखांहून जास्त मतांनी जिंकलेले असून त्यांनी मागच्या वेळी ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांच्यावर मिळविलेल्या मताधिक्याला (3.71 लाख) मागे टाकले आहे.

भाजप नेत्यांची सरशी

लखनौमधून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मावळते खासदार व सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांचे आव्हान मोडीत काढत 2 लाखांहून जास्त मतांनी विजय मिळविलेला आहे. पोटनिवडणुकांत गोरखपूर व फुलपूर हे दोन मतदारसंघ भाजपाला गमवावे लागले होते. तेही त्यांनी पुन्हा हस्तगत केले असून गोरखपूरमध्ये सिनेअभिनेते रवी किशन हे विजयी झाले आहेत. भाजपाचे राज्य प्रमुख महेंद्रनाथ पांडे, संतोष गंगवार, मथुरातून सिनेअभिनेत्री हेमामालिनी, उन्नावमधून साक्षी महाराज, अलाहाबादमधून रीटा बहुगुणा जोशी, फतेहपूरमधून केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती, गौतम बुद्ध नगरमधून केंद्रीय मंत्री महेश शर्मा, गाझियाबादमधून केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह या साऱयांनी पुन्हा एकदा यश मिळविलेले आहे. मनेका गांधी व त्यांचे पुत्र वरुण गांधी यांनी अनुक्रमे सुलतानपूर व पिलभीतमधून विजय मिळविला आहे. समाजवादी पक्ष सोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेल्या सिनेअभिनेत्री जयाप्रदा यांना मात्र रामपूरमध्ये ‘सप’च्या आझम खान यांच्यासमोर निराश व्हावे लागले आहे.  महागठबंधनमध्ये ‘बहुजन समाज पक्षाला’ 11 जागा, तर समाजवादी पक्षाला त्यांनी लढविलेल्या 27 पैकी अवघ्या 6 जागा मिळाल्या.

 

यामुळे नरेंद्र मोदी यांना हटवून नवीन पंतप्रधान देशाला देण्याच्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या आवाहनाला लोकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 2014 प्रमाणे समाजवादी पक्षाचे आव्हान यादव कुटुंबापुरते मर्यादित राहिल्याचे दिसून येते. त्यातही त्यांना संमिश्र यश मिळाले आहे. मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव त्यांची पत्नी डिंपल यादव यांनी यश मिळविले असून मावळते खासदार धर्मेंद यादव व अक्षय यादव यांना पिछाडी सहन करावी लागली आहे.

‘बसपा’ची धाव मर्यादित

मायावती यांच्या बसपाला 2014 मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे यावेळी लढविलेल्या 38 पैकी प्राप्त झालेल्या 11 जागा म्हणजे चांगलीच कामगिरी म्हणावी लागेल. मात्र उत्तर प्रदेशमध्ये प्रभावी कामगिरी करून पंतप्रधानपदासाठीच्या दावेदार बनण्याचे जे स्वप्न मायावती यांनी पाहिले होते ते फोल ठरले आहे. तीन जागा लढविलेल्या राष्ट्रीय लोकदलच्या वाटय़ाला एक जागा आलेली असून जाट समुदाय 2014 मधील लोकसभा निवडणूक आणि 2017 मधील विधानसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाच्या मागे उभा राहिल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या अजित सिंग यांना पराभूत व्हावे लागले असून त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांना मात्र बागपतमध्ये केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांच्यावर मात करता आली आहे.