|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्लीत ‘आप’ची धूळदाण

दिल्लीत ‘आप’ची धूळदाण 

नरेंद्र मोदी व भाजपच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ यांच्या लाटेत दिल्लीत काँग्रेस व ‘आम आदमी पक्षा’ची धूळदाण उडाली असून देशाच्या राजधानीतील सर्वच्या सर्व 7 जागा भाजपने जिंकताना 2014 सालच्या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखविली आहे. दिल्लीतील काही लढती या प्रचंड लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यातील ईशान्य दिल्लीतील लढतीत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर, पूर्व दिल्लीत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी काँग्रेसच्या अरविंद सिंग लव्हली यांच्यावर, तर उत्तर-पश्चिम दिल्लीत गायक हंसराज हंस यग्नांनी ‘आप’च्या गगन सिंग यांच्यावर मोठय़ा फरकाने मात केली. दक्षिण दिल्लीत काँग्रेसने मुष्टिय़ोद्धा विजेंदर सिंगला उतरविले होते. पण ही चाल उपयोगी न ठरून तिथे भाजपाचे रमेश भिदुरी विजयी ठरले. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, मावळत्या लोकसभेतील खासदार मिनाक्षी लेखी, प्रवेश वर्मा यांनीही विजय खेचून आणला आहे. भाजपच्या बहुतेक उमेदवारांचे विजय 3 ते 4 लाखांच्या मताधिक्याने मिळालेले असून यावरून या लाटेची तीव्रता कळून चुकते. सातपैकी सहा जागांवर काँग्रेस दुसऱया क्रमांकावर राहिला आहे. यामुळे ‘आप’ची लोकप्रियता कशी उतरणीला लागल्याचे दिसून येते. स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षात युतीसाठी भरपूर चर्चा झाली होती. पण त्यांच्यात शेवटी युती होऊ शकली नव्हती. ही बाब भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे या निकालातून दिसून येते. काँग्रेसनेही दिल्लीच्या लढती प्रतिष्ठेच्या बनविल्या होत्या. पण ठसा उमटविण्यात त्यांना यश आलेले नाही.