|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » v‘रालोआ’ची दणदणीत सरशी

v‘रालोआ’ची दणदणीत सरशी 

बिहार

काही राज्यांप्रमाणे बिहारमध्येही दणदणीत विजयाची नोंद करताना ‘रालोआ’ने 40 पैकी 39 जागा जिंकलेल्या आहेत. 2014 च्या तुलनेत 8 जागा त्यांनी अधिक जिंकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 17 आणि संयुक्त जनता दलाने 16 जागा जिंकल्या असून राम विलास पासवान यांच्या ‘लोक जनशक्ती पार्टी’ला 6 जागांवर यश मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाला (राजद) खातेही उघडता आले नसून त्यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला अवघ्या एका जागेवर समाधानी राहावे लागले.

बिहारमधील काही लढती या जास्तच लक्षवेधी बनल्या होत्या. त्यापैकी बेगुसरायमध्ये भाजपाच्या गिरिराज सिंग यांनी ‘सीपीआय’ने रिंगणात उतरविलेले विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांचा 4 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. त्याचप्रमाणे पाटणा साहीब मतदारसंघात काय घडते याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले होते. तिथे भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सिनेअभिनेते व भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांचा 2.78 लाख इतक्या मताधिक्याने पराभव केला. ‘रालाओ’तर्फे भाजपचे राधामोहन सिंग (पूर्व चंपारण), आर. के. सिंग (आरा), आश्विनी कुमार चौबे (बक्सर), राजीव प्रताप रुडी (सारण), रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान (जामुई), बंधू पशुपती कुमार पारस (हाजिपूर) यांना विजय प्राप्त झाला आहे. महागठबंधनमधील लोकसभेचे माजी अध्यक्ष मीरा कुमार (सासाराम), ‘आरएलएसपी’चे प्रमुख उपेंद्र कुशवाह, ‘विकासशील इन्सान’ पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी (खागारिया), बिहारचे माजी मुख्यमंत्री व ‘हिंदुस्तानी अवाम मोर्चा’चे जीतनराम मांझी या साऱयांना पराभव स्वीकारावा लागला आहे. महागठबंधनतर्फे एकमेव विजय काँग्रेसच्या डॉ. मोहम्मद जावेद यांनी किशनगंजमध्ये नोंदविलेला आहे.बिहारमध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, फुटीरतावाद हे मुद्दे भारी ठरल्याचे दिसून येते.

 

त्याचप्रमाणे एकूण मतदारांत 30 टक्के वाटा उचलणारे अतिमागासवर्गीय हे ‘रालोआ’च्या आणि खास करून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठीमागे असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारत-नेपाळ सीमेला भिडलेल्या उत्तर बिहारमधील मतदारसंघांतील ‘रालोआ’चा विजयही लक्षणीय आहे. याच्या उलट महागठबंधनने ‘आरक्षण’ धोक्यात असल्याचा दिलेला नारा चालला नाही. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंब यांचा करिश्माही या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वगुणांची ही पहित्यात ते अपयशी ठरल्याचे दिसून आले. ‘यादव-मुस्लीम’ ही ‘राजद’ची वोटबँक मानली जाते. मात्र त्यातही यावेळी फूट पडून बिहारच्या मुस्लीमबहुल पूर्वोत्तर भागात राजद-काँग्रेस आघाडीला खातेही उघडता आले नाही.