|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर अन् माढय़ात मोदींची त्सुनामी

सोलापूर अन् माढय़ात मोदींची त्सुनामी 

प्रतिनिधी/ सोलापूर

कायम चर्चेत राहिलेल्या माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रात्री दहा वाजण्याच्या मतमोजणी पेंद्रावरील माहितीनुसार आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील अपडेटनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानापैकी एकूण 10 लाख 74 हजार 318 इतके मतदान मोजले गेले. यामध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना 5 लाख 19 हजार 774, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 63 हजार 213 तर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 68 हजार 694 इतकी मते मिळाली होती. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी हे तब्बल 1 लाख 56 हजार 261 मतांची आघाडी घेऊन पुढे होते. केवळ थोडक्यामतांची मोजणी होऊन त्यांचा निकाल घोषित करण्याची औपचारिकता बाकी राहिली होती.

  दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाच्या 28 पैकी 25 फेऱया मोजून झाल्या होत्या. यामध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 5 लाख 83 हजार 191 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना 4 लाख 98 हजार 441 मते मिळाल्याची माहिती समोर आली होती. तद्वतच नाईक-निंबाळकर हे 84 हजार 550 मतांची लीड घेऊन पुढे होते.

  केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या केंद्रस्थानी आणि लक्षवेधी लढतीमध्ये हॉट मतदारसंघ म्हणून चर्चेत राहिलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली.

 देशात आलेल्या मोदींच्या त्सुनामी लाटेचा प्रभाव या दोन्ही मतदारसंघात प्रभावीपणे जाणवला. भाजपाने सोलापूरचा गड कायम राखतानाच, माढय़ाचा गड नव्याने जिंकत या जिह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर आपली निर्विवादपणे हुकुमत आणली. यातून येथील लोकसभा निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी दिसत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱयांदा पराभवाची चव चाखावी लागली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अत्यंत नवखे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी भाजपाचे कमळ फुलविताना सुशीलकुमार तसेच प्रकाश आंबेडकरांसारख्या तगडय़ा उमेदवाराला चारी मुंडय़ा चित केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अपेक्षित मते घेतली असली तरी त्यांच्या उमेदवारीचा प्रत्यक्ष फायदा हा भाजपाच्या उमेदवारालाच झाला. ‘शिंदे, आंबेडकरांना मतदारांनी नाकारलं अन् महास्वामींना निवडलं’ असाच इथल्या मतदाराजाचा कौल शेवटी राहील अशी स्थिती आहे.

जिह्यातील दुसऱया माढा हॉट मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या ‘संजय शिंदे या राष्ट्रवादी तसेच काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला झिडकारलं अन् मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर उमेदवाराला तारलं’ असा जनमताचा कौल दिला गेला.

विशेषत्वे, महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्यास निघालेल्या बहुजन वंचित आघाडीच्या खुद्द ऍड. प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून विजय मिळविता आला नाही. उलट त्यांच्या उमेदवारीचा फटका सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज्जाला बसला. त्याशिवाय भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विजयासाठी वंचित आघाडीचा सोलापूरमध्ये फायदा झाल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सोलापुरातील रामवाडी गोदामात आज बुधवार सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. या मतमोजणीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांची पहिल्या फेरीपासूनच विजयाच्या दिशेने घोडदौड झाली. अशातच माढय़ामध्ये भाजपाचेच उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आघाडीवर राहिल्याचे चित्र मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत दिसले.

दि. 18 एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 13 उमेदवारांच्या खासदारकीच्या भवितव्याचा फैसला मतदारसंघातील 10 लाख 81 हजार 386 मतदारांनी केला होता. त्याची मतमोजणी सुरु आहे. तर दि. 23 एप्रिल रोजी माढय़ाच्या आखाडय़ातील 31 उमेदवारांच्या संसद सदस्य पदाच्या भवितव्याचा फैसला या मतदारसंघातील तब्बल 12 लाख 11 हजार 48 मतदारांनी केला. या  जनमताचा कौल आज मतमोजणीवेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून समोर आला.   

माढा लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा सामना दिसून आला. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱयांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आघाडीवर होते. तद्नंतर मात्र निवडणूक फेऱयांचा नूर बदलल्याचे चित्र दिसते. भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे पारडे प्रत्येक  फेरीला जड झाल्याचे दिसले. या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगळी स्थिती होती. भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांची पहिल्या फेरीपासून आघाडी दिसली.

मोहिते-पाटलांच्या नेतृत्वाचा दिसला ‘करिश्मा’

लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचे कमळ हाती घेतलेल्या माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील तसेच खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मुख्य माळशिरस तालुक्यास माढा मतदारसंघातील नेतृत्वाची जादुई झप्पी नक्कीच दिसली. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना भाजपाकडून निवडून आणण्यात मोहिते-पाटील यांचे तगडे नेतृत्व कामी आले.

 

जाणता राजाची नव्हे, पंत अन् दादांची सक्सेस रणनीती

माढय़ाची राष्ट्रवादीची जागा कायम राखण्यासाठी पर्यायाने अकलूजच्या मोहिते-पाटील यांना ईट का जवाब पत्थरसे देण्यासाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनी संजय शिंदे यांना निवडणुकीसाठी सर्वच आघाडय़ांवर रसद पुरवली होती. संजय शिंदे यांची उमेदवारी ही शरद पवारांची उमेदवारी मानली गेली होती. पण पवारांची रणनीती येथे अयशस्वी ठरली. त्यातुलनेत पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलविण्यासाठी घोडदौड ठेवलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची रणनीती येथे सक्सेस ठरली. राष्ट्रवादीच्या ताब्यातील जागा त्यांनी हिसकावून घेतली.

 

जनतेच्या कौलाची रात्री आठ वाजता अशी होती स्थिती

रात्री आठच्या वृत्तानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना 5 लाख 5 हजार 132, काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 3 लाख 54 हजार 994 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 63 हजार मते मिळाली आहेत. यात भाजपचे उमेदवार महास्वामी यांनी 1 लाख 50 हजार 138 मतांची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. तसेच बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 5 लाख 82 हजार 705 तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना 4 लाख 97 हजार 778 मते मिळाली आहेत. भाजपाचे नाईक निंबाळकर हे 1 लाख 10 हजार मतांची आघाडी घेऊन पुढे असल्याचे सांगण्यात आले.