|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उस्मानाबादेतून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी

उस्मानाबादेतून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी 

सचिन वाघमारे/ उस्मानाबाद

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणातील 14 उमेदवाराना मतदारांनी दिलेला कौल जाहिर झाला. उस्मानाबादेतून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाजपक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर 1 लाख 26 हजार मतांनी विजयी झाले आहेत. सहा विधानसभा मतदार संघात मोदी फॅक्टर सुसाट वेगाने धावल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. अटीतटीच्या ठरलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील पारंपारिक लढतीत ओमराजे निंबाळकर यांनी एकतर्फी बाजी मारली.  पोस्टल मतदान वगळता एक लाख 26 हजारांहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचा पराभव करीत ओमराजे यांनी विजयश्री हस्तगत केला. या दोन उमेदवारांव्यतिरिक्त मैदानात असलेल्या बारा उमेदवारांना आपले अनामत रक्कम राखता आली नाही. रात्री उशीरापर्यंत पोस्टल आणि व्हीव्हीपॅटची मतमोजणी सुरू होती. चौथ्या क्रमांकावर नकारात्मक मतांची सर्वाधिक नऊ हजार 961 एवढी नोंद झाली आहे.

   ओम राजेनिंबाळकर अणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा आणि बार्शी या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. लातूर आणि सोलापूर जिह्यातील प्रत्येकी एक आणि उस्मानाबाद जिह्यातील चार विधानसभा मतदार संघांतून अकरा लाख 96 हजार 166 मतदारांनी आपला कौल नोंदविला होता. त्यापैकी तब्बल पाच लाख 90 हजार 890 मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्या बाजूने समर्थन नोंदविले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चार लाख 64 हजार 21 मतदारांनी कौल दिला आहे. पोस्टल मतदान वगळता अंतिम फेरीअखेर सेनेचे राजेनिंबाळकर यांनी तब्बल एक लाख 26 हजार 651 मतांनी राणाजगजितसिंह पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. तिसऱया क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी 97 हजार 749 मतदारांचे समर्थन घेत झेप घेतली आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक नकारात्मक मतदारांनी कौल दिला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांना अनामत रक्कम राखता आली नाही.  मोदी फॅक्टरचा जिह्यातील लोकसभा निवडनूकीत मोठा प्रभाव दिसून आला. 

स्टार प्रचारकांनी, राष्ट्रवादीची लावली वाट …

राज्यभरात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची झालेली वातावात पहाता, स्टार प्रचारक म्हणून मिरवणाऱया बोलक्या पोपटांना मतदारांनी चांगलाच इंगा दाखवून दिल्याचे मतदान यंत्रातून दिसून आले आहे. पंतप्रधानासारख्या जबाबदार व्यक्तीच्या विरोधात खालच्या पातळीवर जावून केलेली टीका मतदारांना रूचली नाही. या स्टार प्रचारकांनीच राष्ट्रवादीची वाट लावण्यात हातभार लावल्याची चर्चा आता मतदारांतून सुरू झाली आहे.

Related posts: