|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत पुन्हा संजयकाकांचा झेंडा

सांगलीत पुन्हा संजयकाकांचा झेंडा 

प्रतिनिधी/ सांगली

निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असलेल्या आणि काँग्रेसने उमेदवार न देता स्वाभिमानीला जागा सोडल्यामुळे चुरस निर्माण झालेल्या सांगली मतदारसंघात संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा विजयी झेंडा रोवला. प्रतिस्पर्धी विशाल पाटील आणि बहुचर्चित गोपिचंद पडळकर यांना पराभूत करीत जवळपास एक लाख 61 हजार 730 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. विशाल दुसऱया तर पडळकर तिसऱया क्रमांकावर राहिले. संजयकाकांच्या विजयाने समर्थकांनी भाजपा कार्यालयासह जिल्हय़ात ठिकठिकाणी आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. 

लोकसभेसाठी 23 एप्रिलला झालेल्या मतदानामध्ये सुमारे 65.38 टक्के इतके मतदान झाले होते. याची गुरूवारी सकाळी आठ वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली.

 सन 2014 च्या तुलनेत दोन टक्के मतांची वाढ होती. ही वाढलेली मते कोणाची याबाबत प्रचंड उत्सुकता होती. त्यातच वंचितचे गोपिचंद पडळकर यांनी या निवडणूक जोरदार हवा केल्याने निकालाबाबत अंदाज बांधणे कठीण झाले होते. प्रत्यक्ष मतमोजणीत मात्र संजयकाका पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच मताची आघाडी घेतली. ती विशाल पाटील व पडळकर यांना तोडता आली नाही. विशेष म्हणजे टपाली मतदानात विशाल पाटील यांनी अडीच हजाराचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. मात्र पहिल्या फेरीमध्ये संजयकाका यांनी सुमारे दहा हजाराचे मताधिक्य घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग पसरले.

 दुसऱया फेरीपासून संजयकाकांचे मताधिक्य वाढतच गेले. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरूवात केली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नऊ फेऱयांमध्ये काकांना सुमारे 80 हजार इतके मताधिक्य मिळाले होते. नवव्या फेरीअखेर काकांना दोन लाख 69 हजार 860 तर विशाल पाटील यांना एक लाख 85 हजार 649 इतके मते मिळाली. पडळकर यांनी एक लाख 46 हजार 529 इतकी मते मिळाली. सर्वच फेऱयांमध्ये काकांना सरसरी पाच ते सात हजाराचे मताधिक्य मिळत गेले यामुळे काकांचा विजय निश्चित होणार असल्याचा अंदाज आल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. येथे जावून त्यांनी फटाक्याची अतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. ाला सुरूवात केली.

आठव्या फेरीअखेर लाखांचे मताधिक्य

पहिल्या फेरीपासून फेरीमध्ये संजयकाकांना मताधिक्य मिळत गेले. यामुळे काकांचे मताधिक्यात वाढच होती होती. काकांनी आठ फेरीअखेर तीन लाखाचा आकडा पार केला तर त्यांनी विशाल पाटील यांच्यावर निर्णायक आघाडी घेत लाखाचे मताधिक्य मिळविले या फेरीअखेर काकांना तीन लाख 17 हजार 454, विशाल पाटील दोन लाख 14 हजार 392 तर पडळकर यांना एक लाख 74 हजार 421 इतके मते मिळाली. यावेळी सात लाख 27 हजार 724 इतक्या

मतांची मोजणी झालेली होती.

अकराव्या फेरीअखेर सव्वालाखांवर

अकराव्या फेरीअखेर काकांना तीन लाख 65 हजार 665, विशाल पाटील यांना दोन लाख 43 हजार 783 तर पडळकर यांना एक लाख 93 हजार 1994 इतके मते मिळाली. अकराव्या फेरीअखेर काकांचे मताधिक्य एक लाख 26 हजारावर गेले होते. पुढील दोन फेऱयामध्येही काकांचे मताधिक्य कायम राहिले यामुळे 13 व्या फेरीअखेर काकांना चार लाख 10 हजार 60 तर विशाल दोन लाख 84 हजार 159 तर गोपिचंद पडळकर यांना दोन लाख 28 हजार 333 इतके मतदान मिळाले. या फेरीपर्यंत नऊ लाख 50 हजार 493 इतकी मते मोजली होती. आणखी अडीच लाख मते मोजायची होती.

शेवटच्या फेरीपर्यंत सबकुछ काकाच

बाराव्या फेरीचा अपवाद वगळत संजयकाकांनी प्रत्येक फेरीला मताधिक्य घेतले.  काकांना एकूण तब्बल 1 लाख 61 हजार 730 मताधिक्य मिळाले. एकूण 1176231 मतांपेकी काकांना 502601 मते, विशाल पाटील यांना 340871 तर गोपिचंद यांना 296979 इताकी मते मिळाली. यामुळे काका विजयी झाले.

          काकांच्या मताधिक्यात घट

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला असला तरी 2014 निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काकांच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. त्यावेळी मोदी लाटेत दोन लाख 39 हजार 292 इतके मताधिक्य मिळाले होते. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र त्यांच्या मतात घट झाली. पडळकर यांना जत, आटपाडी या भागातून चांगले मतदान मिळाले. याचा फटका काकांच्या मताधिक्यावर झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.

मतमोजणी एक तास उशिरा

सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरूवात झाली, पण ही मते मोजण्यास उशिर लागला. नऊ वाजेतर्यंत ही मोजणी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणीला तब्बल एक तास म्हणजे नऊ नंतर सुरूवात झाली. राज्य व देशभरातील इतर ठिकाणच्या निकालाच्या फेऱया गतीने जाहीर होत असताना सांगलीची मतमोजणी मात्र अतिशय संथ गतीने सुरू होती. यामुळे सर्व फेऱयांचा निकाल लांबणीवर पडला. अंतिम फेरीचा निकाल येण्यास रात्र झाली.