|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धारवाडमधून प्रल्हाद जोशी यांचा विजयी चौकार

धारवाडमधून प्रल्हाद जोशी यांचा विजयी चौकार 

वार्ताहर/ हुबळी

धारवाड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार प्रल्हाद जोशी हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी मंत्री व काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांचा 205072 मतांनी पराभव केला. प्रल्हाद जोशी यांना 6,84,837 इतकी मते मिळाली. तर विनय कुलकर्णी यांना 479765 इतकी मते मिळाली. नोटाअंतर्गत मतांची संख्या 3512 आहे. या मतदार संघात एकूण 17,27,311 मतदार असून त्यापैकी 12,09,993 मतदारांनी मतदान केले. 70.05 टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपला 56.59 टक्के, काँग्रेसला 39.65 टक्के तर इतर पक्षांना 3.76 टक्के मते मिळाली आहेत. 

धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठामध्ये गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी निवडणूक अधिकारी दीपा चोळण यांनी मतमोजणी करणाऱया कर्मचाऱयांना मार्गदर्शन पेले. व्हीव्हीपॅटच्या पडताळणीनंतर दीपा चोळण यांनी निकाल जाहीर करताना प्रल्हाद जोशी विजयी झाल्याचे जाहीर केले.

प्रल्हाद जोशी हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. 2004 मध्ये त्यांनी धारवाड उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बी. एस. पाटील यांचा 83078 मतांनी पराभव केला होता. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसचे मंजुनाथ कुन्नूर यांचा 137663 मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्ये प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस उमेदवार विनय कुलकर्णी यांचा 113657 मतांनी पराभव केला होता.

यंदा 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु मुख्य लढत भाजप व काँग्रेसमध्येच झाली.

मोदींची लाट, विकासकामांमुळे पुन्हा संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आपण मतदारसंघामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे मतदारांनी आपणाला पुन्हा संधी दिल्याची प्रतिक्रिया प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये झाली नव्हती तेवढी विकासकामे पंतप्रधान मोदी यांच्यामुळे आता झालेली आहेत. आपण मतदारसंघाच्या अधिकाधिक विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.