|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतमोजणी केंद्रावर कँटीन, दवाखानेही

मतमोजणी केंद्रावर कँटीन, दवाखानेही 

प्रतिनिधी/ बेळगाव

आरपीडी कॉलेज आवारात गुरुवारी झालेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, कँटीन व दवाखान्याचीही सोय करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱयांच्या तात्पुरत्या कार्यालयाला लागूनच औषधोपचाराची व्यवस्था होती.

या दवाखान्यात बिम्समधील तीन तज्ञ डॉक्टर, तीन नर्स, दोन शिपाई, दोन रूग्णवाहिका चालक दिवसभर रूग्णसेवेत गुंतले होते. दिवसभरात 100 हून अधिक जणांवर उपचार केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खास करून अतिरक्तदाब व ऍसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येणाऱयांची संख्या अधिक होती, असे डॉक्टरांनी सांगितले.

मतमोजणी केंद्रांबरोबरच आरपीडी कॉलेजच्या आवारात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थितपणे सोय करण्यात आली होती. याबरोबरच कर्मचारी, अधिकारी, पत्रकार यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या एजंटांसाठी स्वतंत्र कँटीनची सोय होती. यामध्ये चहा, कॉफी, नाष्टय़ाबरोबरच ताक, लस्सी, दूध आदी पदार्थ ठेवण्यात आले होते.

वाढत्या उन्हामुळे ताक, लस्सीला मागणी अधिक होती. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर, यशोदा वंटगोडी आदी अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. मतमोजणी केंदाबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती.

गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी आर. विशाल यांचे आरपीडी कॉलेज आवारात आगमन झाले. त्यावेळी नियमानुसार त्यांनी स्वतः आपला मोबाईल कारमध्ये ठेवला. कारण जिल्हा निवडणूक अधिकाऱयाला मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरण्याची मुभा नव्हती. पोलीस अधिकाऱयांनीही आपल्याकडील मोबाईल वाहनामध्ये ठेवल्याचे दिसून आले. केवळ निवडणूक निरीक्षक व पत्रकारांना या आवारात मोबाईल वापरण्याची मुभा होती.