|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उत्सुकता, हुरहुर अन् विजयोत्सव

उत्सुकता, हुरहुर अन् विजयोत्सव 

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभेच्या निवडणुकीत नेमके काय होणार? याची प्रचंड उत्सुकता आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी संपल्यानंतर वाढत जाणारी हुरहुर अशा वातावरणात मताधिक्मक्मयात वाढ झाल्यानंतर दुपारपासूनच विजयोत्सव असे चित्र गुरुवारी बेळगावात पाहायला मिळाले. प्रचंड बंदोबस्तामुळे मतमोजणी केंद्राकडे समर्थकांची गर्दी नसली तरी शहराच्या वेगवेगळय़ा भागात गटागटाने जमून राष्ट्रीय पातळीवरील विजयाचा जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेस व इतर पक्षीय पराभूत उमेदवार यांना नाराज होऊन परत फिरावे लागले.

गुरुवारी सकाळी 8 पासून मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर ही हुरहुर वाढली होती. बेळगाव लोकसभा मतदारसंघात काय होणार, याच बरोबरीने संपूर्ण देशभरातही काय होणार, याकडे प्रत्येक पक्षीय कार्यकर्त्याचे आणि सामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले होते. एक्झिट पोल आणि वेगवेगळय़ा अंदाजात भाजपला मताधिक्मय मिळणार हे स्पष्ट झालेले असले तरी त्याची आकडेवारी काय असेल याबाबत संभ्रम होता. दरम्यान, भाजपने सर्वाधिक मताधिक्मय मिळविल्याने विजयोत्सवाला सुरुवात झाली होती.

उमेदवार निवड आणि इतर कारणांमुळे बेळगावात आपला विजय होईल, अशी आशा काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, ही आशा पूर्णपणे फोल ठरल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे परतणे पसंत केले. मतमोजणी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. यामुळे केंद्र परिसरात हुल्लडबाजी किंवा जल्लोष करण्यास कोणताच वाव नव्हता. उमेदवार आपल्या काही निवडक समर्थकांसह दाखल होऊन आनंद व्यक्त करताना दिसत होते.

दुपारनंतर गुलाल उधळून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी पेढे वाटण्यात आले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हा आपला विश्वास सार्थ झाला, अशा प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या. अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ लाभल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते. व्हीव्हीपॅट पडताळणीमुळे विजयाची अधिकृत घोषणा होण्यास विलंब झाला. यामुळे विजयी उमेदवाराची मात्र घालमेल होत होती. खासदार झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच देण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी आर. विशाल यांनी दिल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत उमेदवार आणि त्यांचे समर्थक थांबून राहिले होते.