|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनंतकुमार हेगडे यांचा सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम

अनंतकुमार हेगडे यांचा सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम 

प्रतिनिधी/ कारवार

कारवार लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे यांनी केला. या मतदारसंघातील निवडणूक दि. 23 एप्रिल रोजी झाली होती. गुरुवारी कुमठा येथील डॉ. ए. व्ही. बाळीगा कला आणि विज्ञान महाविद्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीवेळी अनंतकुमार हेगडे यांनी काँग्रेस आणि निजद मित्रपक्षांचे उमेदवार आनंद असनोटीकर यांचा 4,79,649 मतांनी पराभव केला. अनंतकुमार हेगडे यांना 7,86,042 इतकी तर आनंद असनोटीकर यांना 3,06393 मते मिळाली.

 कारवार लोकसभा मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार (7 उमेदवार राजकीय पक्षांचे आणि सहा अपक्ष उमेदवार) निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दुसऱया स्थानावर असलेले आनंद असनोटीकर यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविण्यात यश आले नाही. सुधाकर किरा जोगळेकर (बसप) यांना 7 हजार 195, नागराज नाईक (रासप) यांना 3 हजार 378, नागराज श्रीधर शेट (राष्ट्रीय जन संभावना पार्टी) यांना 36 हजार 182, मंजुनाथ सदाशिव (भारत भूमी पार्टी) यांना 1,685, सुनील पवार (उत्तम प्रराजकीय पार्टी) यांना 3,727, अनिता अशोक शेट (अपक्ष) 2,568, कुंदाबाई गणपती परुळेकर (अपक्ष) 2261, चिदानंद हरिजन (अपक्ष) 3138, नागराज अनंत शिराली (अपक्ष) 6254, बाळकृष्ण अर्जुन पाटील (अपक्ष) 4206 आणि मोहम्मद खतीब (अपक्ष) यांना 7488 इतकी मते मिळविण्यात यश आले. नोटा अंतर्गत पडलेल्या मतांची संख्या 16,017 आहे.

सर्व आठ विधानसभा मतदारसंघात हेगडे यांना आघाडी

कारवार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून भाजपचे हेगडे यांनी विरोधकांच्या तुलनेत अनेक बाबतीत आघाडी घेतली होती. हेगडे यांच्या उमेदवारीवर पहिल्यांदा शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानंतर हेगडे यांनी प्रचाराच्या बाबतीतही आघाडी घेतली होती. आणि आता मतमोजणीनंतर भाजपच्या हेगडे यांनी कारवार लोकसभा मतदारसंघात समावेश होत असलेल्या सर्व आठ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे.

भाजप आणि मित्रपक्षांचे दावे मतदारांनी फोल ठरविले

कारवार लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपचे अनंतकुमार हेगडे यांनी आपण किमान 3 लाख मतांनी बाजी मारू, असा दावा केला होता. तथापि, मतदारांनी हेगडे यांना सुमारे 4 लाख 80 हजार मताधिक्य मिळवून दिले. याउलट काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार आनंद असनोटीकर यांनी किमान 1 लाख मतांनी आपण हेगडे यांच्यावर मात करू, असा दावा केला होता.  तथापि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

असनोटीकर यांची पराभवाची हॅट्ट्रिक

काही वर्षापूर्वी कारवार विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या असनोटीकर यांच्या वाटय़ाला एका पाठोपाठ एक पराभवाचे धक्के येत आहेत. 2009 आणि 2014 मधील विधानसभा निवडणुकीत ते हरले आणि आता पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघातील लढतीत पराभव पत्करून असनोटीकर यांनी पराभवाची हॅट्ट्रिक साधली आहे.

काँग्रेस नेत्यांची मतमोजणी केंद्राकडे पाठ

कारवार लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसतर्फे उमेदवार निवडणुकीच्या आखाडय़ात उतरविण्यात आला नव्हता. भाजपचे हेगडे यांच्या विरोधात मित्रपक्षांचे आनंद असनोटीकर निवडणुकीला सामोरे गेले होते. मित्र पक्षांच्या विशेष करून काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना पराभवाची चाहुल लागली होती की काय कुणास ठाऊक त्यामुळे त्यांनी मतमोजणी केंद्राकडे पाठ फिरविली होती.