|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती 

2014 च्या मोदी लाटेत मिळालेल्या यशापेक्षाही मोठे यश मिळवत मोदीजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रात 2014 मधे भाजप शिवसेना युतीने 48 पैकी 42 जागा जिंकून इतिहास घडवला होता. आत्ताही जवळपास तेवढय़ाच म्हणजे शिवसेना 18 व भाजपा 23 अशा 41 जागा जिंकत विरोधकांच्या अपप्रचाराला सणसणीत उत्तर दिले आहे. 2014 मध्ये जिंकलेली 42 वी जागा  तेव्हा युतीत असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या राजू शेट्टींची होती.

‘बारामतीसह देशात अनपेक्षित निकाल लागले तर लोकांचा मतदानावरील विश्वास उडेल आणि ते कोणत्याही टोकाला जातील’  असे अशोभनीय विधान एव्हीएम मशिनबद्दल अविश्वास दाखवत शरद पवारांनी केले होते. पण आता बारामतीत सुप्रियाचा विजय झाल्याने आपण केलेल्या वक्तव्यावर खजील व्हायची वेळ या जाणत्या राजावर आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बारामतीची जागा दिली होती. जानकर जर कमळ चिन्हावर लढले असते तर निकाल वेगळा लागला असता असे काहींचे म्हणणे होते. यावेळी भाजपने कुठलीच कसर न सोडता कमळ चिन्हावरच कांचन कुल यांना मैदानात उतरविले होते व चंद्रकांत पाटलांनी ही जागा जिंकायचीच म्हणून शिकस्त केली.

सुप्रियाताईंचा मतदारसंघातील संपर्क, संसदेतील त्यांचे कार्य याची पावती म्हणून त्यांना 1 लाख 54 हजार मतांच्या मताधिक्मयाने बारामतीकरांनी निवडून दिले. कांचन कुल यांना पुणे शहराचा भाग असलेल्या खडकवासला मतदारसंघात 1,52,487 मते मिळून 65,494 चे मताधिक्मय मिळाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत खडकवासला विधानसभा मतदारसंघात लीडमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. दौंड मतदारसंघातही कांचन कुल यांना चांगले मताधिक्मय मिळाले. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होणार आहे. मावळमध्ये मात्र अननुभवी आणि अजित पवारांच्या आग्रहाने उमेदवारी मिळालेल्या पार्थचा दणदणीत पराभव झाला. पार्थला 504750 तर शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंना 720663 मते मिळाली.

भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेडमध्ये दारुण पराभव केला. 2014 मधे महाराष्ट्रात जिंकलेल्या  केवळ 2 जागांपैकी एक असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड हा गड मानला जात होता. मात्र, प्रताप चिखलीकर यांच्या विजयाने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लागला आहे. वंचित आघाडी फॅक्टरमुळे अशोक चव्हाण तिसऱया क्रमांकावर फेकले गेले.

 देशभरामध्ये भाजपा आणि मित्रपक्षांची अभूतपूर्व यश मिळत असताना काही ठिकाणी शिवसेनेला अनपेक्षित अपयशाला सामोरे जावे लागले आहे. शिरूरमधील शिवसेनेचे विद्यमान आणि कार्यक्षम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी पराभव केला आहे. शिवसेना सोडून कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले. शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 49.17 टक्के मते मिळाली. 23 उमेदवार उभे असणाऱया या मतदारसंघातील जवळजवळ 50 टक्के म्हणजेच 6 लाख 32 हजार 442 मते मिळाली. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱया आढळराव पाटील यांना 44.64 टक्के म्हणजेच 5 लाख 74 हजार 164 मते मिळाली. कोल्हे यांनी 58 हजार 278 मतांनी आढळराव यांचा पराभव केला. सध्या चालू असलेल्या संभाजी महाराजांच्या मालिकेतील भूमिकेचा डॉ.कोल्हेंना उपयोग झाला असावा. खरेतर दक्षिण भारतात नटांना अशा प्रकारचे यश मिळण्याची परंपरा आहे. कोल्हेंचा विजय आश्चर्यकारक आहे. 2009 मधे मुंबईत असाच राम नाईकांचा अभिनेता गोविंदाने आश्चर्यकारकरित्या पराभव केला होता. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला मात्र मतदारांनी थारा दिला नाही.

दुसरे एक शिवसेनेचे औरंगाबादचे लढाऊ खासदार चंद्रकांत खैरे यांचा झालेला निसटता पराभव हाही असाच धक्कादायक निकाल. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना 389042 तर खैरेंना 384550 मिळाल्याने खैरेंचा केवळ 4692 मतांनी पराभव झाला. पराभवाला कारणीभूत ठरले ते 2,83,798 मते घेणारे रावसाहेब दानवेंचे जावई असलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव. ते लढले नसते तर खैरेंचा विजय नक्की होता. यावर ‘माझ्या जावयाच्या पराभवापेक्षा खैरेंच्या पराभवाने मला जास्त दु:ख झाले’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

पवार घराण्यातील मतभेद, देशातील बदललेली राजकीय परिस्थिती, माढा मतदारसंघातील गटातटाचे राजकारण, मोहिते पाटलांचा घसरणारा मतदारसंघातील प्रभाव, स्वतःचा या मतदारसंघाशी तुटलेला संपर्क, स्वतः उभे राहिल्यामुळे माढा मतदारसंघातच अडकून राहावे लागण्याची शक्मयता या सहा प्रमुख कारणांमुळे शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा होती. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पराभवाने हे खरे ठरले आहे. भाजपाच्या राजेंद्रसिंह हिंदूराव नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीवादीच्या संजयमामा शिंदेंचा  62157 मतांनी पराभव केला. अशीच गाजलेली जागा म्हणजे काँग्रेसचे विरोधी नेते असलेल्या विखे पाटलांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांची. तिकीट मिळत नाही म्हटल्यावर थेट भाजपात प्रवेश करीत डॉ. विखेनीं तिकीट मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगतापांचा दणदणीत पराभव केला. डॉ.विखेंना 457934  तर संग्राम जगतापांना  272693 मते मिळाली. आणखी एक लक्षवेधी लढत होती स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची. सैन्यदलात शहीद होणाऱयात ‘देशपांडे-कुलकर्णी नसतात’ असा सैन्यदलांचा व ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे विधान त्यांनी केले होते. शेट्टी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात सुमारे 35 हजार ब्राह्मण मतदार आहेत. मतदारसंघातील सैनिकांच्या नातेवाईकांनी व ब्राह्मण समाजाने केलेल्या अपमानाचा बदला घेतला आणि शेट्टींचा पराभव केला. शिवसेनेच्या नवख्या असलेल्या धैर्यशील मानेंना 543366 मते मिळाली तर राजू शेट्टींना 444397 मते मिळाली.

एनडीएला बहुमत न मिळाल्यास मोदींना विरोध म्हणून गडकरींना संधी मिळेल असे वातावरण काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांनी तयार केले होते. भाजपातून स्वगृही काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले गडकरींना हरवणार अशाही वावडय़ा उठविण्यात आल्या. पण तरीही ते 168265 मताधिक्मयाने निवडून आले. गडकरींना 54.83 टक्के म्हणजे 557026 मते मिळाली तर पटोलेंना 38.36 टक्के म्हणजे 389761 मते मिळाली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि अमरावतीचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, अकोला आणि सोलापूर मधून प्रकाश आंबेडकर यांचे पराभव हीही निवडणुकीची वैशिष्टय़े ठरली.

क्षितिजा कोठेकर