|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आता तरी उपरती होईल का?

आता तरी उपरती होईल का? 

लोकसभा निवडणुकीत अखेर चौकीदार मोदींचीच जादू चालली हे उघड होतानाच 60 वर्षे या देशात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसचा सर्वत्र दारुण पराभव व्हावा! 17 राज्यांमध्ये हा पक्ष एक जागादेखील जिंकू शकला नाही, ही खरेतर अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱया या पक्षाचे नेते आणि गांधी घराण्याचे अखेरचे आधारस्तंभ राहुल गांधी यांच्यावर या पराभवाची जबाबदारी येऊन पोहोचते. राहुल गांधी हे राजकारणात अद्याप पक्के मुरलेले नाहीत. गोरगरीबांना वार्षिक रु. 72 हजारची मदत करू, अशी घोषणा देणाऱया या पक्षाचे राष्ट्रीय धोरण चुकीच्या मार्गावर जाते आहे. सलग दुसऱयांदा भाजपला सत्तेवर नेऊन पोहोचविणाऱया भारतातील जनतेला पक्के माहीत आहे की, त्यांना काय हवे आहे! मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. एवढी वाईट परिस्थिती आली की, अर्धशतक देखील काँग्रेस पक्ष पार करू शकला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला मिळू शकलेले नाही. आता 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्वाच्च भाषेत त्यांची निंदा नालस्ती करणाऱया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला संपविण्यासाठी विशेषतः नरेंद्र मोदी यांना संपविण्याच्या उद्देशाने ‘चौकीदार चोर है’ पासून अनेक गोष्टींद्वारे मोदींवर आगपाखड केली. मोदींना संपविण्यासाठी अनेक सापळे रचले खरे परंतु जनतेने या सर्वांनाच घरी बसविले. राहुल गांधी यांच्याकरिता चंद्राबाबू नायडू यांनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली आणि स्वतःच्या आंध्र प्रदेशात स्वतःचीच यथेच्छ धुलाई करून घेतली. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्तेवर येताच एकच नारा लावला, ‘काँग्रेसमुक्त भारत’! व त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आणि गेल्या पाच वर्षात झालेल्या बहुतेक विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारून एकेक राज्य आपल्या ताब्यात घेतले. कर्नाटक व आणखी एक अशी केवळ दोनच राज्ये काँग्रेसच्या ताब्यात राहिली मात्र गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व पंजाब ही राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आली व कर्नाटकात काँग्रेसने जनता दल सेक्युलरबरोबर आघाडी करून तात्पुरते राज्य आपल्या ताब्यात घेतले. 2019च्या या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना मोदी विरोधात वचपा काढण्याची नामी संधी चालून आली खरी मात्र गुरुवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाला. नरेंद्र मोदींना संपविण्यासाठी काँग्रेसने व राहुल गांधी यांनी अथक प्रयत्न केले. सर्व विरोधी पक्षांबरोबर आघाडी करूनही पाहिले मात्र अनेक दिग्गजांच्या पराभवाने काँग्रेस पक्ष हादरला आणि सर्वात जास्त धक्का काँग्रेसला बसला तो अमेठी या गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा झालेला दणदणीत पराभव. राहुल गांधी यांना आत्मविश्वास नव्हता म्हणून त्यांनी केरळच्या वायनाडमध्ये जाऊन तिथे उमेदवारी सादर केली होती. अन्यथा राहुल गांधी हे आज नव्या लोकसभेत उपस्थित राहू शकले नसते. गेल्या पाच वर्षात लोकसभेत ज्यांनी काँग्रेसचे नेतृत्व केले त्या मल्लिकार्जुन खर्गेसारख्या नेत्यांचाही दारुण पराभव होणे, काँग्रेसच्या अस्तित्वालाच हात घातल्यासारखा हा प्रकार आहे. अत्यंत नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कम्युनिस्ट पक्ष. एकेकाळी या देशात 60 ते 70 खासदार असणाऱया या पक्षाचे अस्तित्व काय! केवळ दोनच खासदार अशी या पक्षाची ओळख झालेली आहे. गेल्या पाच वर्षात काँग्रेसने केवळ नकारात्मक भूमिका घेतली. राहुल गांधी यांच्या वागण्यातून अनेकदा अपरिपक्वता दिसून आली. त्यातच ‘चौकीदार चोर है!’ या त्यांच्या निवेदनाचा उलटा परिणाम या पक्षावर झाल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाला आज 134 वर्षांची देदीप्यमान अशी परंपरा लाभलेली आहे. गेल्या 60 वर्षात पक्ष एका घराण्यात गुरफटून गेला. गांधी घराणे सांगेल ती पूर्व दिशा! याप्रमाणे वागणारे सैनिक या पक्षात तयार झाले. या सैनिकांनी पक्ष वाढविण्यावर भर न देता गांधी घराण्याची पूजा करण्यातच जास्त धन्यता मानली. घराणेशाहीची ही परंपरा भाजपने मोडीत काढली. अपवादात्मक एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकाला उमेदवारी दिली असेल परंतु शिस्तीचा बडगा त्यांनी राबविला आणि या लोकसभा निवडणूक निकालातून घराणेशाहीचे कंबरडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱयांनी मोडून टाकले. आता या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने अखेरीस त्याची नैतिक जबाबदारी अर्थातच, काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांच्यावरच येत असल्याने अखेर त्यांच्यावरच राजीनाम्याची पाळी आलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 51 जागापर्यंत सीमित राहील, असे कोणालाही वाटले नव्हते परंतु जनतेने दिलेला हा कौल स्वीकारण्याखेरीज या पक्षाच्या नेतृत्वाला दुसरा कोणताही पर्याय नाही. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच 17 राज्यांमध्ये हा पक्ष भोपळाही फोडू शकला नाही. खुद्द राजस्थानसारख्या एका मोठय़ा राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर असूनदेखील एक खासदारदेखील निवडून येऊ शकत नाही, यावरून काँग्रेसचे नेतृत्व खुजे पडते आहे, यात शंकाच नाही. देशाला आज एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस पक्ष ही भूमिका सक्षमपणे बजावू शकतो का हा प्रश्न आता राजकारणात उपस्थित झाला आहे. जनता राहुल गांधींना गंभीरपणे घेत नाही, हेच यावरून सिद्ध होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत थेट न उतरता शहा, पवार व राष्ट्रवादीच्या छुप्या प्रचारात उतरलेल्या राज ठाकरे यांच्या ‘लाव  रे तो व्हीडिओ’ या कार्यक्रमांतर्गत मोठ-मोठय़ा जाहीर सभा घेऊन अमित शहा व नरेंद्र मोदींची लक्तरे काढणाऱया राज ठाकरेंचे निवडणुकीत जसे अधःपतन झाले, त्याच पद्धतीने राहुल गांधी व त्यांच्या पक्षाचे झाले आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत भुईसपाट का झाला? इतर राज्यात सोडून द्या, ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या पंजाब वगळता इतर राज्यात काँग्रेसची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्याबाबत काँग्रेसने सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. या पक्षाकडे राहुल गांधी वगळता आता दुसरा सक्षम नेता राहिलेलाच नाही. दारुण पराभवाने होरपळून गेलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा वर काढणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आव्हान म्हणून स्वीकारताना काँग्रेसला आता यानंतर आपल्या ध्येय-धोरणातही बदल करावाच लागेल व जर बदल केले नाही तर या पक्षाची अवस्था कम्युनिस्टांप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही. या निवडणूक निकालानंतर तरी राहुल गांधींना शहाणपणा सुचेल काय?