|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सुरतमध्ये अग्नितांडवात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू

सुरतमध्ये अग्नितांडवात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू 

भीषण आग : जीव वाचविण्यासाठी मारल्या बहुमजली इमारतीवरून उडय़ा

सुरत / वृत्तसंस्था

सुरतमधील मुंबई-अहमदाबाद मार्गानजीक एका व्यावसायिक इमारतीत शुक्रवारी भीषण आग लागली. आगीत अडकलेल्या बहुमजली इमारतीमधील लोकांनी जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडय़ा मारल्या. आतापर्यंत या दुर्घटनेत 18 लोकांनी जीव गमावल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यामध्ये बहुतांश जण कोचिंग क्लासचे विद्यार्थीच आहेत. मृतांच्या आकडय़ात वाढ होण्याची शक्यता आहे, असे पोलीस आयुक्त सतीश कुमार मिश्रा यांनी सांगितले. परंतु आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुरतमधील सरथाना विभागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स या व्यावसायिक इमारतीत काही दुकाने आणि शिकवणी केंद्रे आहेत. मृतांमध्ये जास्त विद्यार्थी आहेत, जे कॉम्प्लेक्समध्ये एका शिकवणीमध्ये शिकण्यासाठी आले होते. शिकवणीचा वर्ग सुरू असतानाच आग लागल्यामुळे विद्यार्थ्यांना दुर्घटनेची माहितीच समजली नाही. मात्र, आजूबाजूला गोंधळ सुरू होताच विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यासाठी बहुमजली इमारतीवरून एकापाठोपाठ एक उडय़ा मारल्या. त्यामुळे इमारतीवरून कोसळल्यामुळे बऱयाच जणांचा मृत्यू झाला. तसेच काही जणांचा आगीत होरपळूनही मृत्यू झाला. या विचित्र घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोक पसरला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह राज्यातील केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

आग लागल्याची घटना घडताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. इमारतीमधून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडत असल्याचे दिसून येत होते. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 18 गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

मृतांच्या वारसांना 4 लाखांची आर्थिक मदत

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आगीच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असे गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त

या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. सुरतमधील घटनेमुळे खूप दुःखी झालो आहे. मृतांच्या परिवाराला माझ्याकडून सहानुभूती आहे. गुजरात सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून शक्य ती मदत करण्यासाठी सांगितले आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले

दुर्घटनेवेळी इमारतीत

50 पेक्षा अधिक विद्यार्थी

आगीच्यावेळी इमारतीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यातील बऱयाच विद्यार्थ्यांचा मृत्यू घाबरून इमारतीवरून उडी मारल्यामुळे झाला आहे.