|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीसह दक्षिण गोवा मतदारसंघ पुन्हा जिंकणार

पणजीसह दक्षिण गोवा मतदारसंघ पुन्हा जिंकणार 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

प्रतिनिधी/ पणजी

पुढील निवडणुकीत पणजी मतदारसंघासह दक्षिण गोव्याची जागाही जिंकणार, असा दावा करून दीर्घ काळानंतर पणजी मतदारसंघ तसेच दक्षिण गोवा मतदारसंघ गमवावा लागल्याने दु:ख होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. तीन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले.

काल शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की पोटनिवडणुकीत जनतेने भाजपवर विश्वास दाखवित तीन भाजप उमेदवारांना विजयी केले. त्याचबरोबर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात बहुतेक मतदारसंघामध्ये भाजपला मोठे मताधिक्य दिले. मात्र पणजी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला त्याचे दु:ख असल्याचे ते म्हणाले. पणजी मतदारसंघातील काम भाजप वाढविणार असेही ते म्हणाले.

मांद्रे, म्हापसा व शिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिरोडा मतदारसंघात अटीतटींची लढत झाली. 76 मतांनी भाजप उमेदवार जिंकला. मात्र दक्षिण गोवा मतदारसंघात केवळ 9000 मतांनी पराभव पत्करावा लागला. नरेंद्र सावईकर यांचा जनसंपर्क चांगला होता. खासदार निधीतून चांगले काम झाले होते. मात्र हा मतदारसंघ भाजप पुन्हा जिंकणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार मजबूत बनले

तीन आमदार निवडून आल्याने आता भाजप आमदारांचे संख्याबळ 17 झाले आहे. गोवा फॉरवर्डचे तीन, अपक्ष तीन आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. विजय सरदेसाई यांनी आपल्याला निकाल होताच फोन केला. मगोचा पाठिंबा सरकारला आहे. तो ठेवावा की कढावा हे मगोने ठरवायचे आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अपक्ष आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी उत्तर गोव्यात व शिरोडा मतदारसंघात भरपूर काम केले. प्रियोळ मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळवून दिले, असेही ते म्हणाले.

मोदी, शहांचे अभिनंदन

देशभरात भाजपने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळविले. त्याबद्दल गोमंतकीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. केंद्रातील सरकारचा गोव्याला मोठा फायदा होणार आहे. खासदार श्रीपाद नाईक व विनय तेंडुलकर हे गोव्याला आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. साधनसुविधा निर्मितीची जी कामे आहेत त्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या काही योजना आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या शपथविधीला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी वेळी आपण व खासदार दिल्लीला जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतीच पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली. या बैठकीला पदाधिकारी उपस्थित होते.

स्थिर सरकार देणार

भाजपचे सरकार स्थिर आहे. यानंतर स्थिर सरकार देणार असेही ते म्हणाले. खाणपट्टय़ात मतदानावर फार मोठा परिणाम झाला नाही. उत्तर गोव्यात कोणताही परिणाम दिसून आला नाही. दक्षिण गोव्यात संमिश्र परिणाम झाला. सुदिन ढवळीकर यांच्या भूमिकेचा लोकसभा निवडणुकीत फार मोठा परिणाम दिसून आला नाही, असेही ते म्हणाले.  

विधानसभा अधिवेशन जुलैमध्ये

विधानसभा अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. 31 जुर्ले पूर्वी अधिवेशन घ्यावे लागेल. सर्वांशी बोलून अधिवेशन ठरविले जाईल, त्याचबरोबर सभापतीची निवडही लवकरच होणार आहे. घटक पक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

श्रीपादभाऊ नाईक यांचा विक्रम

उत्तर गोव्यातून पाचवेळा निवडून येऊन श्रीपादभाऊ नाईक यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी लोकसभेवर सलग पाचवेळा कुणी निवडून आलेला नाही. उत्तर गोव्यात भाजपला 57 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 38 टक्के मते मिळाली. जनतेने मोठा प्रतिसाद दिला. सर्व मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले. केवळ 4 मतदारसंघ वगळता अन्य 16 मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.