|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्रीपादभाऊंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे

श्रीपादभाऊंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे 

संपूर्ण गोव्यातून होतेय मागणी

विशेष प्रतिनिधी/ पणजी

सलग पाचव्यांदा प्रचंड मतांनी विजयी झालेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपादभाऊ नाईक यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्याची मागणी आता पूर्ण होण्याची शक्यता आहेच. परंतु यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून घेण्यात यावे, अशी मागणी विविध स्तरावरून होऊ लागली आहे. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी पक्ष श्रेष्ठींकडे चर्चा करणार असल्याचे सांगितले.

सध्या केंद्रीय आयुष मंत्रालयाचा कारभार सांभाळीत असलेल्या उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना आता कोणते खाते मिळणार व कोणते पद मिळणार याबाबत जनतेत कमालीचा उत्साह व उत्कंठा आहे. येत्या दि. 30 मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा होत असून गोव्याचे नेतृत्व करणाऱया श्रीपादभाऊ नाईक यांचा या मंत्रिमंडळात सामवेश केला जाणार आहे. तथापि त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत मात्र कमालीची उत्सुकता आहे. वाजपेयी सरकारमध्ये राज्य मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या श्रीपादभाऊंना मोदी सरकारने देखील राज्य मंत्री म्हणून समावेश केला होता. आयुषमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा देशात तसेच विदेशांमध्येही झाली आहे.

पाचव्यांदा विजयी होण्याचा विक्रम

लोकसभेवर सलग पाचव्यांदा विजयी होण्याचा विक्रम श्रीपाद नाईक यांनी केलेला आहे. त्यातूनच आता भाजपच्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱयांनी देखील श्रीपाद भाऊंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळावा, अशी मागणी सुरु केली आहे. गेली पाच वर्षे श्रीपाद नाईक आयुष मंत्रीपदाचा कारभार सांभाळीत आहेत. त्यांना तो स्वतंत्र कारभार दिला होता. त्यामुळे आता श्रीपाद नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गोव्याला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. श्रीपादभाऊ नाईक यांना तो मान मिळावा यासाठी गरज पडल्यास पक्षश्रेष्ठींकडे चर्चा केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

श्रीपाद नाईक दिल्लीला रवाना

पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानुसार देशातील सर्व भाजप खासदारांना आज दि. 25 रोजी नवी दिल्लीत हजर राहाण्यास सांगितल्याने श्रीपाद नाईक हे शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्लीला रवाना झाले. आज होणाऱया बैठकीत ते सहभागी होतील.