|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा जवानांचा निरोपपर संचलन सोहळा

मराठा जवानांचा निरोपपर संचलन सोहळा 

प्रतिनिधी/ जवान

येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रूजू होणाऱया जवानांचा निरोपपर संचलन सोहळा शुक्रवारी पार पडला. या जवानांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांच्या डोळय़ांचे पारणे फेडले. तसेच देशसेवेसाठी प्रसंगी प्राणांची आहुती देण्याची तयारी असल्याची शपथ घेतली.

मराठा लाईट इन्फंट्री केंद्राचे कमांडंट ब्रिगेडीयर गोविंद कलवाड यांनी जवानांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रध्वज आणि धर्मग्रंथांच्या साक्षीने जवानांचा शपथविधी पार पडला. आपल्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवानांना चषक पदके आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या पथसंचलनाचे नेतृत्व जवान अशोक वंदाडी यांनी कॅप्टन अभिनव राय यांच्या मार्गदर्शनानुसार केले होते. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठीचा कर्नल आर. डी. निकम चषक ऋषभ संजय पाटील याला देण्यात आला. फायरिंगमधील उत्कृष्ट कामगिरीचा नामदेव जाधव सन्मान ज्ञानेश्वर कराळी यांना लाभला. उत्कृष्ट शारिरीक कवायतींसाठीचा सुचासिंग स्मृती गौरव सन्मान अक्षय भोसले यांनी मिळविला.

फिल्ड क्राफ्टमधील प्रशिक्षणाचा कर्नल एन. जे. नायर सन्मानाचा मानकरी दीपक सोमासे हा ठरला. शारिरीक प्रशिक्षण विभागातून उत्कृष्ट कामगिरीबद्दल मेजर एस. एस. ब्रार पदकाचा मानकरी ऋषभ पाटील हा ठरला. संचलनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन केशवराव तळकर पदक व चषकाचा मानकरी अशोक वंदाडी हा ठरला.

वीरपत्नींचा गौरव

याच कार्यक्रमाच्या प्रसंगी शहीद जवानांच्या वीरपत्नींचा गौरवही करण्यात आला. कै. नाईक, दीपक जगन्नाथ घाडगे यांची पत्नी निशा, कै. नाईक संदीप सर्जेराव जाधव यांची पत्नी शोभा आणि शिपाई सावन बाळकू माने यांच्या मातोश्री शोभा माने यांना यावेळी गौरविण्यात आले.