|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मच्छे येथे तीन लाखांची घरफोडी

मच्छे येथे तीन लाखांची घरफोडी 

प्रतिनिधी/ बेळगाव

मच्छे (ता. बेळगाव) येथील एका बंद घराचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी तीन लाखांचे सोन्या, चांदीचे दागिने व रोकड पळविली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता ही घटना उघडकीस आली असून रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफाआयआर दाखल करण्यात आला आहे.

मच्छे येथील जोतिबा पाटील या शेतकऱयाच्या घरी चोरी झाली आहे. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलुप लावून जोतिबा शेताला गेले होते. त्यांची पत्नी व मुले कामानिमित्त खानापूरला गेले होते. सायंकाळी 5 वाजता घरी परतले त्यावेळी दरवाजा उघडा होता.

संशयाने त्यांनी घरात प्रवेश करुन पाहिला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. कपाटातील साडेआठ तोळे सोने, 8 तोळे चांदी व 32 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.