|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीज कोसळून खडकलाटच्या तरुणाचा मृत्यू

वीज कोसळून खडकलाटच्या तरुणाचा मृत्यू 

वार्ताहर/ खडकलाट

शेतात बकरी चारविण्यासाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना इब्राहिमपूर (ता. शिरगुप्पा, जि. बळ्ळारी) येथे गुरुवारी घडली. हालाप्पा राघू गावडे (वय 38, रा. खडकलाट, ता. चिकोडी) असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राघू गावडे यांची बकरी बळ्ळारीकडे असतात. सदर बकरी हालाप्पा व त्याचे कुटुंबीय सांभाळतात. गुरुवारी सकाळी 9 वाजता हालाप्पा व मजूर शिवाप्पा उपलापुरा हे दोघेही बकरी चरविण्यासाठी बाहेर पडले. दिवसभर बकरी चारुन दुपारी 4.30 वाजता इब्राहिमपूर येथील अंदानास्वामी यांच्या शेतात बकरी चारवित असताना अचानक हालाप्पा याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मजूर शिवाप्पाने कुटुंबीयांना दिली.

घटनेची माहिती मिळताच शिरगुप्पा पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर तालुका सरकारी इस्पितळात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे खडकलाटसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. हालाप्पा याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.