|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कूपनलिकेच्या पाणी उपशामुळे विहिरींनी तळ गाठला

कूपनलिकेच्या पाणी उपशामुळे विहिरींनी तळ गाठला 

प्रतिनिधी/ बेळगाव

रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकरिता पाण्याची कमतरता भासत असल्याने कलामंदिर आवारात खोदण्यात आलेल्या कूपनलिकेच्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्येंनी तळ गाठला आहे. टिळकवाडी परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला तेंड द्यावे लागत आहे. यामुळे कूपनलिकेच्या पाणी उपशावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र याकरिता भरपूर पाणी लागत आहे. याकरिता पाणी विकत घेण्याची वेळ कंत्राटदारावर आली आहे. तसेच कलामंदिरच्या जागेत उभारण्यात येणाऱया व्यापारी संकुलाकरिता पाण्याची गरज आहे. यामुळे कंत्राटदाराने कलामंदिर आवारात कूपनलिकांची खोदाई केली आहे. सदर कूपनलिकेला सध्या मुबलक पाणी असल्याने पाण्याचा उपसा करून काँक्रीटीकरण करण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी वापरण्यात येत आहे. 12 हजार क्षमता असलेले आठ ते दहा टँकर पाणी दररेज उपसा करण्यात येत आहे. यामुळे दररोज एक लाख लिटर पाण्याचा उपसा केला जात असल्याने टिळकवाडी परिसरातील विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. परिसरातील कूपनलिका व विहिरीमधील पाणीसाठा कमी होत नसे. मात्र मागील पंधरा दिवसापासून कूपनलिकेच्या पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने विहिरींचा पाणीसाठा संपुष्टात आला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. टिळकवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नव्हती. पण कूपनलिकेद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने परिसरातील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांनी पाणी उपसा करण्यास आक्षेप घेतला आहे. तसेच याबाबत स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांसह कंत्राटदाराकडे तक्रार केली आहे.

सध्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी खालावली असल्याने नळांना सुरळीत पाणी पुरवठा केला जात नाही. यामुळे बहुतांश परिसरात कूपनलिका व विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. पण कूपनलिकेचे पाणी आटल्याने टिळकवाडी परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकारी, स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांसह महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून कलामंदिर येथील कूपनलिकेचा पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे..