|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डिजिटल फलक जीवघेणा ठरण्याची शक्मयता

डिजिटल फलक जीवघेणा ठरण्याची शक्मयता 

प्रतिनिधी/ बेळगाव

 गोवावेस येथील बसवेश्वर चौकात वाहतूक कोंडी आणि अपघात घडत असल्याने ट्रफिक सिग्नल बसविण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटी योजनेमधून चौकात डिजिटल फलक उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण हा फलक जीवघेणा ठरण्याची शक्मयता आहे. यामुळे डिजिटल फलक आवश्यक की, ट्रफिक सिग्नल असा मुद्दा उपस्थित होत आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि जाहिरातबाजीकरिता डिजिटल जाहिरात फलक उभारण्यात येत आहेत. शहरातील विविध चौकात फलक बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यापूर्वी गोगटे चौकात फलक बसविला आहे. तसेच आता गोवावेस येथील बसवेश्वर चौकात डिजिटल फलक बसविण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले रोड शेजारी असलेल्या नाल्यावर जनावरे व शेतकऱयांचा पुतळा उभारला आहे. त्याठिकाणी आता डिजिटल जाहिरात फलक उभारला आहे. यामुळे जनावरे व शेतकऱयाचा पुतळा दिसण्यास अडसर झाला आहे.

बसवेश्वर चौकात विविध रस्ते मिळतात. याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.   याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध केली नाही.  खानापूर रोडचे रूंदीकरण केल्याने वाहनांची गर्दी मोठय़ाप्रमाणात असते. परिणामी हा चौक धोकादायक बनला असून परिसरात अपघात घडत आहेत. यामुळे चौकात ट्रफिक सिग्नल बसविण्याची मागणी होत आहे. या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेमधून ट्रफिक सिग्नल बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोणतीच कारवाई केली नाही. पण ट्रफिक सिग्नल बसविण्याकडे दुर्लक्ष करून चौकात डिजिटल जाहिरात फलक उभारला आहे. मात्र या डिजिटल फलकामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. याठिकाणी वाहतूक नियंत्रणाच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना हाती घेण्यात आल्या नाहीत. फलक उभारल्याने वाहनधारकांना जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.

वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडण्याची शक्मयता गृहित धरून चौकामध्ये जाहिरात फलक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी महापालिकेने करून चौकातील जाहिरात हटविले होते. पण स्मार्ट सिटी योजना राबविताना न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे.